वसई-विरार परिवहनचे कर्मचारी पुन्हा संपावर

वसई-विरार परिवहनचे  कर्मचारी पुन्हा संपावर

फेब्रुवारीचा पगार न मिळाल्याने वसई विरार महापालिकेच्या परिवहन सेवेच्या कर्मचार्‍यांनी काम बंद आंदोलन सुरु केले आहे. (छाया । हनिफ पटेल)

ठेकेदाराने हमी देऊनही फेब्रुवारीचा पगार वेळेत न दिल्याने संतापलेल्या वसई विरार महापालिकेच्या परिवहनच्या कर्मचार्‍यांनी मंगळवार काम बंद आंदोलन सुरु केले. संध्याकाळपर्यंत यावर कोणताच तोडगा न निघाल्याने आंदोलन सुरु राहिल्याने दिवसभरात प्रवाशांचे हाल झाले.

वसई विरार महापालिकेची परिवहन सेवा पूर्णपणे ठेका पद्धतीवर चालू आहे. गेल्या काही महिन्यांपासून ठेकेदार वेळेवर, तोही एकरकमी पूर्ण पगार देत नसल्याने कर्मचार्‍यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. गेल्या महिन्यात कर्मचार्‍यांनी चार दिवस काम बंद आंदोलन केले होते. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली होती. त्यावेळी ठेकेदाराने दरमहिन्याला 10 तारखेला एकरकमी पूर्ण पगार दिला जाईल, अशी लेखी हमी दिल्यानंतर कर्मचार्‍यांनी काम सुरु केले होते.

पण, फेब्रुवारी महिन्याचा पगार दहा तारीख उलटून गेल्यानंतरही न दिल्याने कर्मचार्‍यांनी मंगळवारी सकाळपासून काम बंद आंदोलन सुरु केले. त्यामुळे शहरातील बससेवा ठप्प होऊन प्रवाशांचे हाल झाले. प्रशासनाकडून ठेेकेदाराशी बोलणी करण्यात आली. मात्र, दोन-तीन दिवसात पगार करू, असे ठेकेदार मनोहर सकपाळ यांनी प्रशासनाला सांगितले. पण, कर्मचारी आजच पगार झाला पाहिजे यामागणीवर अडून बसल्याने कोणताही तोडगा निघू न शकल्याने काम बंद आंदोलन सुरुच राहिले आहे. परिणामी शहरातील बससेवा ठप्प झाली आहे.

First Published on: February 12, 2020 2:31 AM
Exit mobile version