ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांचे निधन

ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांचे निधन

ज्येष्ठ संगीतकार खय्याम

आपल्या सुरेल संगीताने रसिकांच्या हृदयावर जादू करणारे संगीतकार पद्मभूषण मोहम्मद झहूर खय्याम हाश्मी अर्थात खय्याम यांचे निधन झाले आहे. ते ९२ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. अनेक गाजलेल्या चित्रपटांना त्यांनी संगीत दिले होते. जुहू येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उमराव जान चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्तम संगीतकार म्हणून फिल्म फेअर आणि राष्ट्रीय पारितोषिक मिळाले होते. कभी -कभी चित्रपटासाठीही त्यांना फिल्मफेअर पारितोषिक मिळाले होते. खय्याम यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कारही मिळाला होता.

खय्याम यांचा जन्म १८ फेब्रुवारी १९२७ साली पाकिस्तानमधील पंजाबमध्ये झाला. १९५३ मध्ये अभिनेत्री नर्गिस दत्त यांची आई जद्दनबाई यांच्या शिफारशीमुळे त्यांना ‘फूटपाथ’ हा चित्रपट मिळाला. या चित्रपटाच्या वेळी लेखक झिया सरहदी यांनी त्यांना ‘खय्याम’ या नावाने कारकिर्दीला नव्याने सुरुवात करण्याचे सुचविले. त्यानंतर खय्याम हे नाव त्यांना कायमचे चिकटले. त्याच नावाने मग त्यांनी अनेक चित्रपटांना संगीत दिले. अभिनेता बनण्यासाठी मुंबईत आलेल्या जालंधरच्या खय्याम यांनी संगीतकार म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत आपले बस्तान बसवले. प्रारंभी खय्याम यांनी संगीतकार पं. हुस्नलाल भगतराम यांच्याकडे सहाय्यक म्हणून काम केले. त्यांनी त्यानंतरच्या चाळीस वर्षांच्या कारकिर्दीत पन्नास हिंदी चित्रपटांना संगीत दिले.

First Published on: August 19, 2019 10:32 PM
Exit mobile version