क्यारच्या तडाख्यातील विद्यार्थी शुल्कमाफीच्या प्रतीक्षेत

क्यारच्या तडाख्यातील विद्यार्थी शुल्कमाफीच्या प्रतीक्षेत

राज्यात आलेल्या क्यार वादळ आणि अवेळी झालेल्या पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे क्यारचा फटका बसलेल्या २४ तालुक्यांतील विद्यार्थ्यांना शुल्क माफी देण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला होता. परंतु १० महिने उलटले तरीही विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी मिळालेली नाही.

राज्यात २०१९ मध्ये आलेले वादळ आणि अवेळी पडलेल्या पावसामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी घोषित करण्यात आली होती. यानुसार महसूल व वन विभागाच्या १८ नोव्हेंबरच्या शासन निर्णयानुसार राज्यातील ३४ जिल्ह्यातील ३४९ तालुक्यामधील शेतीपिकांचे व बहुवार्षिक पिकांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. उच्च व तंत्र शिक्षण विभागाने परीक्षा शुल्क माफी देण्याबाबत जाहीर केलेल्या शासन निर्णयात ३४ जिल्ह्यांतील ३२५ तालुक्यांतील विद्यार्थ्यांना शुल्क माफी जाहीर केली. यामुळे अनेक पात्र विद्यार्थी परीक्षा शुल्क माफीच्या सवलतीपासून वंचित राहीले आहेत. महाराष्ट्रातील २४ तालुक्यातील विद्यार्थ्याचे परीक्षा शुल्क माफ करण्याची मागणी सुराज्य विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अमर एकाड यांनी अपर मुख्य सचिव उच्च व तंत्र शिक्षण विभाग व संचालक उच्च व तंत्रशिक्षण विभाग याच्याकडे केली आहे. या प्रकरणी ३४ जिल्यातील ३२५ तालुक्यांऐवजी ३४९ आपदग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्याचे परीक्षा शुल्क माफीसंबंधी योग्य तो आदेश जाहीर करण्याची विनंती तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. अभय वाघ यांनी विभागाच्या अपर मुख्य सचिवांकडे केली आहे. याबाबत लवकरच योग्य तो निर्णय घेतला जाईल अशी आशा विद्यार्थी व्यक्त करत आहेत.

First Published on: November 1, 2020 6:20 PM
Exit mobile version