मुंबईतील चौपाट्यांसह उद्यान, मैदानांसह सार्वजनिक ठिकाणी पाण्याचे एटीएम

मुंबईतील चौपाट्यांसह उद्यान, मैदानांसह सार्वजनिक ठिकाणी पाण्याचे एटीएम

मुंबईत रेल्वे स्थानकावर प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या वॉटर वेंडींग मशिनच्या धर्तीवर मुंबई महापालिकेच्यावतीनेही अशाप्रकारे पाण्याचे एटीएम्स बसवण्याची मागणी होत आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेनेही आता चौपाटीसह उद्यान, मैदानांसह सार्वजनिक ठिकाणी अशाप्रकारची पाण्याचे एटीएम्स बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी विविध संस्थांकडून स्वारस्य अर्ज मागवले असून त्या संस्थांना जाहिरातीचे अधिकार प्रदान करत या वॉटर वेंडींग मशिनद्वारे पर्यटकांना शुध्द पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली जाणार आहे.

मुंबईत सुमारे १२५ वॉटर वेंडींग मशिन्स बसवण्याचा निर्धार

मुंबई महापालिकेच्या जलअभियंता विभागाच्यावतीने जाहिरात देऊन संस्थांकडून स्वारस्य अर्ज मागवण्यात आले आहे. ज्या संस्थांना वॉटर वेंडींग मशिन बसवायची इच्छा असेल तर त्यांच्याकडून महापालिकेने अर्ज मागवले आहे. त्यासाठी महापालिकेच्या सर्व विभाग कार्यालयाच्यां सहायक आयुक्तांकडून गर्दीची ठिकाणांसह चौपाटी आणि उद्यान, मैदानांचा सर्वे करून त्याठिकाणी पर्यटकांना शुध्द पाणी उपलब्ध करून देण्यासाठी कुठे कुठे अशाप्रकारच्या मशिन्स बसवणे शक्य आहे, याचा अहवाल मागवला आहे. प्रत्येक प्रशासकीय कार्यालयाच्या हद्दीत किमान पाच अशाप्रकारच्या मशिन्स बसवण्याच्यादृष्टीकोनातून संस्थांकडून अर्ज मागवले आहे. त्यामुळे मुंबईत सुमारे १२५ वॉटर वेंडींग मशिन्स बसवण्याचा निर्धार महापालिकेने केला आहे.

वॉटर एटीएमसाठी संस्थांना महापालिकेच्यावतीने सार्वजनिक ठिकाणांसह आवश्यक असलेल्या गर्दीच्या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. महापालिकेच्यावतीने या जागा दिल्यानंतर संबंधित संस्थेने स्वखर्चाने वॉटर एटीएम बसवणे आवश्यक आहे. याकरता संबधित संस्थेला त्याठिकाणी जाहिरातीचे अधिकार दिले जाणार आहे. त्यातून त्यांना खर्च भागवण्याची संधी मिळणार आहे. यासाठी पाण्याची जोडणीही महापालिकेच्यावतीने देण्यात येणार असल्याचे जलअभियंता विभागाच्या अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे.

शुल्कातील काही रक्कम महापालिकेला मिळणार

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रविण दराडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वॉटर एटीएमच्या माध्यमातून मुंबईत येणार्‍या पर्यटकांना तसेच लोकांना स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या वॉटर एटीएमसाठी निविदा मागवण्यात आली आहे. जाहिरातीच्या बदल्यात या वॉटर एटीएम बसवता येणार असून महापालिकेच्यावतीने त्यांना जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. चौपाट्यांसह उद्यान, मैदानांसह सार्वजनिक ठिकाणी हे वॉटर एटीएम बसवले जाणार आहे. सर्व विभागांच्या सहायक आयुक्तांनी केलेल्या सर्वेनुसार जिथे आवश्यकता आहे, तिथेच हे बसवले जाणार आहे. यामध्ये जागा उपलब्ध करून दिली जात असले तरी पाण्याचा आकार कमर्शियल दराने आकारला जाणार आहे. शिवाय पाण्यासाठी उपलब्ध होणार्‍या शुल्कातीलही काही रक्कम महापालिकेला मिळणार आहे. त्यामुळे या माध्यमातून लोकांना स्वच्छ आणि शुध्द पाणी पिण्यास उपलब्ध होईल, शिवाय महापालिकेच्या तिजोरीतील महसूलही वाढेल, असा विश्वास दराडे यांनी व्यक्त केला.


हेही वाचा – नाणार प्रकल्पविरोधी आंदोलकांवरील गुन्हे देखील मागे!


First Published on: December 2, 2019 11:15 AM
Exit mobile version