मुरबाडमधील कनकवीरा नदीला जीवदान

मुरबाडमधील कनकवीरा नदीला जीवदान

कनकवीरा नदीचे जलसंवर्धन

वाढत्या नागरीकरणाने ठाणे जिल्ह्यातील वालधुनी, कामवारी या नद्या मरणपंथाला आल्या आहेत. उल्हास नदीतील प्रदूषणाची पातळीही चिंताजनकरित्या वाढली आहे. नद्यांना आलेल्या या अवकळांच्या पार्श्वभूमिवर मुरबाड तालुक्यातील कनकवीरा नदीला स्वयंसेवी संस्था, जिल्हा प्रशासन आणि स्थानिक ग्रामस्थांच्या योगदानामुळे मिळालेले जीवदान जलसंवर्धनासाठी दिशादर्शक ठरणार आहे. गेल्या तीन वर्षात कनकवीराच्या पात्रात नियमितपणे गाळ काढणे, खडक फोडणे अशी कामे सुरू असून त्यामुळे नदीपात्रातील पाणीसाठा खूप पटीने वाढला आहे.

जिल्हा प्रशासन, वसुंधरा संजीवनी मंडळ, कॉर्पोरेट कंपन्यांचा सीएसआर आणि स्थानिकांच्या सहभागाने कनकवीरा नदीपात्रात कामे सुरू आहेत. सह्याद्रीच्या डोंगरात उगम पाऊन २२ किलोमीटर अंतर कापून ही नदी काळू नदीला मिळते. या नदीपात्रात गेल्या दोन दशकात जिल्हा परिषदेने २२ बंधारे बांधले. मात्र त्यापैकी बहुतेक नादुरूस्त आणि गाळाने भरले आहेत. तीव्र डोंगर उतारावरून पावसात वाहून येणाऱ्या दगड-धोंड्यांमुळे नदीपात्र गाळाने भरले होते. त्यामुळे तीन वर्षापूर्वी या नदीला नाल्याची अवकळा प्राप्त झाली होती.

नदीपात्रातील गाळ काढून खोलीकरणाची कामे सुरू

मात्र गेल्या तीन वर्षे मार्च ते जून दरम्यान नदीपात्रातील गाळ काढणे तसेच खोलीकरणाची कामे सुरू असून त्याचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. आतापर्यंत वाघाडी वाडी, पेंढरी आणि तळवली गावालगत असणाऱ्या किमान एक किलोमीटर इतके नदीपात्राचे खोलीकरण झाले आहे. अलिकडेच जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी या कामाची पाहणी केली. तेव्हा पुढील वर्षी नदी संवर्धन मोहीम अधिक व्यापकपणे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. शासनाने बांधलेल्या सर्व २२ बंधाऱ्यांची दुरूस्ती आणि गाळ काढला तर नदीपात्रातील पाणीसाठा खूप पटीने वाढेल, असा विश्वास वसुंधरा संजीवनी मंडळाचे पदाधिकारी माजी आमदार दिगंबर विशे यांनी व्यक्त केला आहे.

कनकवीरा नदीपात्रात मोठमोठे खडक आहेत. काँक्रिटीकरणासाठी मोठ्या प्रमाणात खडी लागते. तेव्हा शासनाने नदीपात्रातून खडी काढण्यास संबंधितांना परवाने दिल्यास नदीचे खोलीकरण अधिक जलद गतीने होऊ शकेल. तसेच अनेक गावांमधील तलाव गाळाने भरले आहेत. तो गाळ काढल्यास मोठ्या प्रमाणात जलसंवर्धन होऊ शकेल.
दिगंबर विशे, वसुंधरा संजीवनी मंडळ

गेली तीन वर्षे वसुंधरा संजीवनी मंडळ आणि स्थानिक ग्रामस्थ कनकवीरा नदीच्या खोलीकरणाचे काम करीत आहेत. त्यातून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात साठा निर्माण होणार आहे. त्याचा आजूबाजूच्या ग्रामस्थांना लाभ होत आहे. यंदा निवडणूक आचारसंहितेमुळे खोलीकरणाच्या कामांना फारसा अवधी मिळाला नाही. मात्र पुढील वर्षी कामे लवकर सुरू केली जातील. तसेच जिल्ह्यातील अन्य दुर्लक्षित जलसाठ्यांचाही जीर्णोद्धार केला जाईल.
राजेश नार्वेकर, जिल्हाधिकारी, ठाणे

First Published on: June 26, 2019 8:11 PM
Exit mobile version