नाले झाले गायब; पावसाने रेल्वेची केली भांडेफोड

नाले झाले गायब; पावसाने रेल्वेची केली भांडेफोड

माटुंगा रेल्वे रुळाजवळील नाला

मुंबईच्या पावसाने रेल्वे प्रशासनाचा गलथान कारभाराचे वाभाडे काढले आहेत. रेल्वेच्या नालेसफाई अभियानाचे पितळ उघडे पडले असताना काही रेल्वे स्थानकाजवळील नालेच गायब असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. त्यामुळे पावसाचे पाणी मुरले नाही की त्याचा निचराही झालेला नाही. पावसामुळे मध्य रेल्वेचा सफाईचा दावा फोल ठरला. मध्य रेल्वेच्या सीएसटी ते ठाणेदरम्यान कित्येक नाल्यातील गाळच काढण्यात आला नाही. कित्येक नाल्यांची सुरुवात कुठून होते आणि संपते कुठे याची कल्पनाच रेल्वेला नव्हती. मध्य रेल्वेच्या माटुंगा रेल्वे स्थानकाजवळ नालाच नसल्याने पाणी मुरले नाही. यापेक्षाही वाईट परिस्थिती माटुंगा, सायन, विक्रोली, कांजूर मार्ग, भांडुप, मुलुंड आणि ठाणे स्टेशनची होती. या स्टेशनजवळ कचऱ्याचे साम्राज्य होते. नाले तुटक्या अवस्थेत असल्यामुळे त्यातून पाणी जातच नव्हते.

यापूर्वी रेल्वे रुळावरच्या कचर्‍यासंबंधित मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी.के.शर्मा यांना विचारले असता ते म्हणाले की, रेल्वे रुळावरचा कचरा उचलण्याची जबाबदारी कुणाची असते सांगण्याची गरज नाही, असे सांगत त्यांनी कचरासफाईबाबत पालिकेला अप्रत्यक्ष टोला हाणला. महापालिका आयुक्त अजोय मेहता आणि मध्य रेल्वे महाव्यवस्थापक डी.के.शर्मा यांनी संयुक्तरित्या मध्य रेल्वेमार्गालगतच्या नाल्याची आणि स्वरंक्षक भीतीची पाहणी केली होती.त्यानंतर रेल्वेलगतच्या कचर्‍याचा डोंगर जीसीपी लावून कमी करण्यात आला होता. तरीही पाणी तुंबले होते.

पंपाचा काही फायदा नाही ?

मध्य – रेल्वेचे ४२ आणि महापालिकेचे १८ असे एकूण ६० फ्लडपंप रेल्वे मार्गावर बसविण्यात आल्याचे रेल्वेकडून लावण्यात आले आहे. विशेष म्हणजे गतवर्षीपेक्षा यंदा १७ अधिक पंप रेल्वेच्या मार्गावर असल्याचा दावाही रेल्वेकडून करण्यात आला होता. मात्र प्रत्येक ठिकाणी हे पंप कार्यरत नव्हते.

रेल्वे आणि पालिकेमध्ये समनव्य नसल्यामुळे आज रेल्वेच्या नाल्याची दूर अवस्था झाली.यावर लक्ष देणे गरजेचे आहे. सोबतच राज्य सरकार आणि केंद्र सरकारने रेल्वेच्या नालेसफाईची स्वतंत्र चौकशी करून दोषी असलेल्या अधिकार्‍यांवर कारवाई करावी.
-सुभाष गुप्ता, अध्यक्ष, रेल्वे यात्री परिषद

पाणी तुंबणारी ठिकाणे 

चिंचपोकळी व करीरोड – २ ठिकाणे.
कुर्ला-सायनच्या मध्ये – ३ ठिकाणी.
मुलुंड-नानीपाडा – १ ठिकाणी.
कुर्ला टर्मिनस – १ ठिकाणी.


नितीन बिनेकर / मुंबई

First Published on: July 12, 2018 8:57 AM
Exit mobile version