मुंबईत छुपी पाणीकपात?

मुंबईत छुपी पाणीकपात?

मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट( फोटो सौजन्य - Hindustan times )

दिवाळीचे फटाके फुटण्यापू्र्वी आता मुंबईतील स्थायी समितीमध्ये पाणी प्रश्न पेटला आहे. मुंबईमध्ये कोणत्याही प्रकारची पाणी कपात नाही अशी ग्वाही पालिका प्रशासनानं स्थायी समितीमध्ये दिली. पण या उत्तरावर नगरसेवक मात्र आक्रमक झाले आणि त्यांनी संताप व्यक्त केला. मुंबईत छुपी पाणी कपात असून पालिका ही बाब लपवत असल्याचं आरोप नगरसेवकांनी केला. मुंबईच्या अनेक भागांमध्ये सध्या कमी दाबानं पाणी पुरवठा होत असल्याचा आरोप यावेळी काही नगरसेवकांनी केला. आपल्या विभागात कमी दाबानं पाणी कपात होत असल्याचा आरोप सभागृह नेत्या विशाखा राऊत, विरोधीपक्ष नेते रवी राजा, अभिजित सामंत, शिवसेनेचे राजूल पटेल आणि संजय घाडी यांनी केला. यावेळी प्रशासनानं मात्र कोणतीही पाणी कपात नाही असं उत्तर दिलं. दरम्यान, दिवाळीनंतर २५ टक्के पाणी कपात होणार आहे का? असा सवाल रवी राजा यांनी केला. मुंबईची तहान भागवण्यासाठी मुंबईतील २०० ते २५० विहिरी साफ कराव्यात अशी मागणी देखील यावेळी केली. पावसानं ओढ दिल्यानं सध्या मुंबईतील धरणांमध्ये कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे जुलै २०१९ पर्यंत  मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी पाणी कपात गरजेचं असल्याचं पालिका प्रशासनाचं म्हणणं आहे. मुंबईला सात धरणांमधून पाणी पुरवठा केला जातो. या धरणांमध्ये सध्या ११ लाख ६८ हजार ४२१ दशलक्ष लिटर पाणीसाठा शिल्लक आहे. हे पाणी पुढील ३०७ दिवस म्हणजे ऑगस्ट २०१९ पर्यंत हे पाणी पुरणार आहे.

वाचा – मुंबईकरांनो पाणी जपून वापरा!! पाणी कपातीची शक्यता

पावसाचं प्रमाण कमी, मुंबईत पाणी कपात 

पावसाचं प्रमाण कमी झाल्यानं मुंबईतील धरणांमध्ये सध्या पाणीसाठा अपुरा आहे. त्यामुळे दिवाळीनंतर मुंबईमध्ये पाणी कपात लागू करण्यात येणार आहे. १० ते २५ टक्क्यांपर्यंत ही पाणी कपात केली जाऊ शकते. पण, सध्या मुंबईमध्ये छुपी पाणी कपात असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे. पालिकेनं छुपी पाणीकपात केल्याचा आरोप काही नगरसेवकांनी केला आहे.

First Published on: November 1, 2018 4:44 PM
Exit mobile version