तहान लागल्यावर खोदल्या अपुऱ्या विहिरी; १५७ त्यापैकी ६४ विहिरी कोरड्या

तहान लागल्यावर खोदल्या अपुऱ्या विहिरी; १५७ त्यापैकी ६४ विहिरी कोरड्या

विहिर

तहान लागल्यावर पाणी खोदणे हे तर आपल्याकडच्या सरकारी व्यवस्थेचे व्यवच्छेदक लक्षण. पाणी टंचाई भेडसावणाऱ्या ठाणे जिल्ह्यात सध्या जिल्हा परिषदेच्यावतीने अशाच प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने ऐन उन्हाळ्यात टंचाई निवारण कृती आराखडा राबविण्यास सुरूवात केली असून पाच तालुक्यांमध्ये १५७ विंधण विहिरी खोदल्या आहेत.

त्यापैकी ९३ विहीरींना पाणी लागले असले तरी निम्म्याअधिक म्हणजे ६४ विहिरी आता कोरड्या पडल्या आहेत. ठाणे जिल्ह्याच्या पाणी टंचाई निवारण कृती आराखड्यानुसार जिल्हा जलव्यवस्थान समितीने एक हजार २२७ विंधण विहीरींना मान्यता दिली आहे. त्यातुलनेत आतापर्यंत जेमतेम दहा टक्के म्हणजे १५७ विंधण विहीरी खोदण्यात आल्या असल्या तरी पुरेसा पाणी पुरवठा होण्याच्या दृष्टीने त्या अत्यंत अपुऱ्या आहेत.

ग्रामीण भागात राबविण्यात आलेल्या बहुतेक नळपाणी पुरवठा योजना नादुरूस्त असल्याने अजूनही ग्रामस्थांना पाणी पुरवठ्यासाठी विहीरींवर अवलंबून रहावे लागते. मात्र जुन्या विहीरींच्या देखभाल दुरूस्तीकडे झालेले दुर्लक्ष, नव्या विहीरी खोदण्याबाबत असलेली उदासिनता आणि भ्रष्टाचार यामुळे ग्रामीण भागातील जनता मोठ्या प्रमाणात तहानलेलीच आहे. गेल्या वर्षी सरत्या पावसाने दडी मारल्याने यंदा जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणी टंचाईचे भीषण संकट आहे. त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनावणे यांनी दिली. त्यानुसार अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी ब. भि. नेमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी पुरवठा विभागाच्यावतीने विविध योजना हाती घेण्यात आल्या आहेत.

खोल खोल पाणी

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, कल्याण, मुरबाड, भिवंडी आणि शहापूर या पाच तालुक्यात जलव्यवस्थापन समितीने एक हजार २२७ विंधन विहिरींच्या आराखड्याला मान्यता दिली आहे. त्यापैकी १५७ विंधण विहीरी खोदण्यात आल्या असून ९३ विहिरींना पाणी लागले होते. तर ६४ विहीरी कोरड्या पडल्या आहेत. पाणी लागलेल्या ९३ विहीरींपैकी ८७ ठिकाणी हातपंप बसविण्यात आले तर, सहा ठिकाणी १२० फुटांपेक्षा खोल पाणी असल्यामुळे त्या ठिकाणी हातपंप ऐवजी विजपंप बसवावे लागणार आहेत. त्यामुळे तिथे हातपंप बसविण्यात आलेले नाहीत, अशी माहिती जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आली.

जलसंधारणाअभावी विहीरी कुचकामी

आधीच ठाणे जिल्ह्यात फारसा भूजलसाठा नाही. त्यात विहीरींमध्ये पाणी कायम राहण्यासाठी आवश्यक जलसंधारण व्यवस्थेचा ग्रामीण भागात अभाव आहे. कुपनलिकांप्रमाणेच विहीरींच्या अवतीभोवती पर्जन्य जलसंधारण केले, तर त्यात पाणी राहण्याचे प्रमाण वाढत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे ज्या विहीरी उन्हाळ्यात आटतात, त्यांच्याभोवती पाणी जमिनीत मुरविण्याच्या उपाययोजना केल्या तर विहीरीतून अधिक मुबलक पाणी मिळू शकेल, अशी माहिती जलतज्ज्ञ आनंद इनामदार यांनी दिली. विहीरी खोदणाचे काम दिलेल्या कंत्राटदाराला त्याभोवती पर्जन्य जलसंधारण करणे बंधनकारक केल्यास त्यांची फारशी देखभाल दुरूस्ती करावी लागणार नाही, असेही त्यांनी सुचविले आहे.

First Published on: May 20, 2019 8:23 PM
Exit mobile version