एसी लोकलमुळे पश्र्चिम रेल्वेची ९ कोटींची कमाई

एसी लोकलमुळे पश्र्चिम रेल्वेची ९ कोटींची कमाई

प्रातिनिधिक फोटो

बहुचर्चित आणि प्रतिक्षित एसी लोकल २५ डिसेंबरचा मुहूर्त गाठत मुंबईकरांच्या सेवेत आली. पण, सेवेत आल्यापासून एसी लोकलला हवा तसा प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे कशापद्धतीने तरी एसी लोकलला प्रवाशांचा प्रतिसाद मिळावा यासाठी रेल्वे प्रशासनाकडून अनेक उपाययोजना करण्यात आल्या. पण, आता गेल्या अनेक महिन्यांपासून एसी लोकलची वाढती पसंती पाहायला मिळतेय. कारण, पश्र्चिम रेल्वेवर धावत असलेल्या एसी लोकलमुळे आतापर्यंत प्रश्चिम रेल्वेला ९ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. दररोज एसी लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी दिलेल्या माहीतीनुसार, सध्या एसी लोकल हाऊसफुल आहे.

इतक्या प्रवाशांनी केला प्रवास

२५ डिसेंबर २०१७ ते जुलै २०१८ पर्यंत २२ लाख ४० हजार ४६२ प्रवाशांनी एसी लोकलमधून प्रवास केला आहे. त्यातून ९ कोटी ३५ लाख ४ हजार ७८१ रुपयांचा नफा पश्चिम रेल्वेला झाला आहे. शिवाय, यापुढेही अशीच परिस्थिती राहिल्यास प्रवाशांचा आणखी चांगला प्रतिसाद मिळू शकेल अशी अपेक्षा जनसंपर्क अधिकारी गजानन महपुतकर यांनी ‘माय महानगर’शी बोलताना व्यक्त केली आहे.

एसी लोकलच्या प्रवाशांची संख्या वाढली

मुंबईसारख्या शहरात दमट हवामान असल्याकारणाने लोकलचा प्रवास अनेकदा नकोसा होतो. त्यामुळे खास मुंबईकरांसाठी रेल्वेच्या चेन्नईतील आयसीएफ कारखान्यात या गाडीची बांधणी करुन ती मुंबईत आणण्यात आली. जवळपास ५४ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेली एसी गाडी २५ डिसेंबरला पहिल्यांदा चालवण्यात आली. रेल्वे मंत्रालयाने तिकिटांचा दर अव्वाच्या सव्वा ठेवल्याने सुरुवातीपासून एसी लोकलमधील प्रवासी संख्या फार वाढणार नाही हा समज होताच. पण, हळूहळू हे चित्र बदलेल असा विश्वास पश्र्चिम रेल्वेला वाटतो आहे.

दररोज १५ हजार ६६६ प्रवासी

एसी लोकलच्या दिवसाला १२ फेऱ्या चालवल्या जातात. त्यात दरदिवशी जवळपास १५ हजार ६६६ प्रवासी प्रवास करतात. आतापर्यंत ९.३५ कोटी रुपये इतका फायदा तिकीट, सीझन पास यातून पश्चिम रेल्वेला झाला आहे. तसंच एका फेरीत १ हजार ३०६ जण सीट वर बसून आणि ६ हजार लोक उभे राहून प्रवास करतात, असे महिन्याला ३.८ लाख प्रवासी करतात.

या फेरीत सर्वात जास्त प्रवासी

पश्चिम रेल्वेवर संध्याकाळी ७.४९ या वेळेत चर्चगेट ते विरार या दरम्यान धावणाऱ्या फेरीला सर्वात जास्त प्रवासी संख्या आहे. जवळपास ११ हजार प्रवासी या फेरीत प्रवास करतात असं ही पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे.

First Published on: August 6, 2018 5:23 PM
Exit mobile version