मुंबईकर कधी सुधारणार? क्वारंटाईन शिक्का पुसून झोपडपट्टीमध्ये मुक्त संचार

मुंबईकर कधी सुधारणार? क्वारंटाईन शिक्का पुसून झोपडपट्टीमध्ये मुक्त संचार

राज्यासह देशात सध्या कोरोनाने थैमान घातले असून, मुंबईत तर दिवसेंदिवस आकडे वाढत आहेत. आकडे दिवसेंदिवस वाढत असताना देखील मुंबईकर मात्र काही सुधारताना दिसत नाही. मुंबईतील अनेक भागांमध्ये सध्या कोरोना रुग्ण सापडलेल्या ठिकाणी रुग्णांच्या संपर्कात आलेले मुक्त संचार करताना पहायला मिळत आहे. विशेष म्हणजे मुक्त संचार करणाऱ्यामध्ये तरुणांचा समावेश हा सर्वाधिक पहायला मिळत आहे. एवढेच नाही तर काही महाभाग तर हातावर असलेला होम क्वारंटाईनचा शिक्का असताना देखील गल्लीबोळामध्ये फेरफटका मारत आहेत तर काही जणांनी हातावरील शिक्केच पुसून टाकले आहेत.

कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्याना गांभीर्य कधी येणार? 

काही झोपडपट्ट्यामध्ये तर कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेले महाभाग परिसरात एकत्र गप्पा मारताना पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या लोकांना सांगण्याची सोय देखील उरलेली नाही. स्थानिक नगरसेवकांनी देखील अशा लोकांपुढे हात टेकले आहेत. जर ही लोक सांगूनही ऐकत नसतील तर आता करायचे तरी काय असा प्रश्न स्थानिक नगरसेवकांना पडला आहे. जोगेश्वरी सारख्या झोपडपट्टीमध्ये हे असे प्रकार सर्रास पहायला मिळत आहेत. दरम्यान या अशा महाभागामुळे झोपडपट्टीमधील वृद्ध व्यक्ती, एखादी आजारी व्यक्ती तसेच गरोदर महिलांना धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकीकडे पालिका, राज्य सरकार तसेच सर्वच सरकारी यंत्रणा कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असताना दुसरीकडे मात्र मुंबईकर सहकार्य करताना दिसत नाहीत. त्यामुळेच भविष्यात मुंबईतील झोपडपट्ट्यामध्ये रुग्णांची आकडेवारी वाढली तर त्याला सर्वस्वी लोकांचा बेजबाबदारपणा कारणीभूत ठरू शकतो.

झोपडपट्टीमध्ये जर कोरोना रुग्ण वाढले तर त्याला सर्वस्वी लोकांचा बेजबाबदारपणा कारणीभूत ठरेल. आज जोगेश्वरीतील बहुतेक विभागात नागरिक हातावरचे क्वारंटाईनचे शिक्के पुसून विभागात फिरत आहेत. त्यामुळे लोकांनी घरात थांबणे हे खूप गरजेचे आहे. जर लोक घरात थांबले तरच कोरोनावर आपण मात करू शकतो.

– बाळा नर, नगरसेवक

सध्या झोपडपट्टीमध्ये कोरोना रुग्ण सापडत असून, सर्दी, ताप खोकल्याचे देखील रुग्ण वाढत आहेत. पण झोपडपट्ट्यामध्ये अजूनही लोकांमध्ये कोरोनाचे गांभीर्य दिसत नाही. लोक अजूनही गल्लीबोळात फिरताना पहायला मिळत आहेत. त्यामुळे जर झोपडपट्टीमध्ये वाढणारे रुग्ण कमी करायचे असतील तर सगळ्यांनी घरात राहणे गरजेचे आहे. पण दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही.

– डॉ. निलेश घेवडे, जोगेश्वरी विभाग.

First Published on: May 11, 2020 2:55 PM
Exit mobile version