मतदान का, कशासाठी करायचे ?

मतदान का, कशासाठी करायचे ?

अनंत जोग

अभिनेता-अनंत जोग…

कोण खरे, कोण खोटे हे आजच्या घडीला ठरवणे फारच अवघड झालेले आहे. जाहीर सभेत ठोसपणे बोलणे हे काही वर्षांपूर्वी सत्य असल्यासारखे वाटत होते. पण विरोधीपक्ष जेव्हा त्यावर आपली प्रतिक्रिया देतात तेव्हा मात्र मन विचलित होते. बोलण्याला तसा पुरावा रहात नाही. परंतु, राज ठाकरे यांनी प्रचारासाठी जे नवीन तंत्र वापरलेले आहे त्यात चित्रफित दाखवून जी सत्यता दाखवून देण्याचा प्रयत्न ते करत आहेत त्यावर आता विश्वास बसायला लागलेला आहे.

सत्तेवर असलेल्या पक्षाने त्यांच्या प्रचार सभेत प्रत्येकाला पंधरा लाख रुपये देण्याचे कबूल केले होते. ते कोणाच्या वाट्याला आलेच नाहीत. परंतु तो प्रचाराचा एक भाग आहे, चुनावी जुमला आहे असे विधान जेव्हा चित्रफितीत आश्वासन देणार्‍या नेत्यांकडून ऐकायला मिळते तेव्हा राज ठाकरे यांच्या बोलण्यात तथ्य आहे असे वाटायला लागते. तरीपण या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर का आणि कशासाठी मतदान करायचे हा प्रश्न पडतोच.

मी चित्रपटातील एक कलावंत आहे. सिनेसृष्टीसाठी बर्‍याच काही गोष्टी कराव्यात असे चित्र आज आहे. तरीपण नव्याने येणार्‍या सरकारने चित्रसृष्टीचा फारसा विचार न करता शहरापासून अलिप्त राहणार्‍या गावकर्‍यांसाठी काही करावे असे मला वाटते. रस्ते, वीज, पाणी या प्राथमिक गरजा उपलब्ध नसल्यामुळे शिक्षणावर त्याचा परिणाम होऊ लागल्याचे पाहायला मिळते.

First Published on: April 22, 2019 4:23 AM
Exit mobile version