ठाणे पालिकेच्या प्रकल्पांना सहकार्य करू; पोलीस आयुक्तांची ग्वाही!

ठाणे पालिकेच्या प्रकल्पांना सहकार्य करू; पोलीस आयुक्तांची ग्वाही!

ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आणि महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यासमोर नुकतेच महापालिकेच्या खाडी किनारा विकास प्रकल्प, महामेट्रो, अंतर्गत मेट्रो, सॅटीस पूर्व, नवीन रल्वे स्टेशन, कळवा ब्रीज, नागरी समुह विकास योजना, नवीन ठाणे आणि कंमाड अँड कंट्रोल सेंटर या प्रकल्पांसह अनेक प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले. या सर्व प्रकल्पांचे सादरीकरण पाहिल्यानंतर पोलीस आयुक्त फणसळकर यांनी महापालिकेचे आणि आयुक्त संजीव जयस्वाल यांचे कौतुक करून पालिकेस संपूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

वाहतुक कोंडीच्या प्रश्नावर चर्चा

महापालिका भवनमध्ये झालेल्या या बैठकीत सुरूवातीस महामेट्रोचे सादरीकरण करण्यात आले. फणसळकर यांनी महामेट्रोची मार्गिका आणि अंतर्गत मेट्रोची मार्गिका यांची माहिती घेतली व त्या अनुषंगाने वाहतुक कोंडी कुठे होवू शकेल? आणि त्यावर काय उपाययोजना करता येईल? यासंबंधी तपशीलवार चर्चा केली. त्याचबरोबर ठाणे स्टेशन परिसर सुधारणा प्रकल्प पूर्व या प्रकल्पाचीही माहिती घेतली. व या प्रकल्पाच्या कामाला सुरूवात केल्यानंतर निर्माण होणारी वाहतुक कोंडी कशी सोडविता येईल? याविषयी चर्चा केली.

महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे कौतुक

यावेळी फणसळकर यांनी नागरी समुह विकास योजनेविषयी माहिती घेतली. प्रकल्पाची आखणी आणि तयार करण्यात आलेले आराखडे त्यांनी पाहिले. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या प्रकल्पाची अंमलबजावणी कशी होईल? याची तपशीलवार विवेचन केल्यानंतर फणसळकर यांनी या प्रकल्पामुळे शहराचा चेहरा-मोहरा बदलण्यास मदत होईल, असा आशावाद व्यक्त केला. तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या प्रकल्पासाठी केलेल्या मेहनतीचे कौतुक केले.

विविध प्रकल्पांची माहिती समजून घेतली

यावेळी त्यांनी कंमाड अँड कंट्रोल सेंटर या प्रकल्पांची माहिती घेवून हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. जवळपास चार तास चाललेल्या या बैठकीमध्ये नवीन ठाणे स्टेशन त्याचे आराखडे, खारेगाव आणि दिवा पादचारू पूल, कळवा ब्रीज, नवीन ठाणे शहर, घोडबंदर रोड बायपास, तीन हात नाका येथील ग्रेड सेपरेटर, पीआरटीएस आदी प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले. या सर्व प्रकल्पांची माहिती फणसळकर यांनी समजून घेतली. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या दुरदृष्टीचे त्यांनी कौतुक केले.

डीजी ठाणे खाडी किनारा विकास प्रकल्पांचे कौतुक

महापालिका आयुक्तांनी खाडी किनारा विकास प्रकल्पाची पार्श्वभूमी समजावून सांगितली व प्रत्यक्षात प्रकल्प उभा राहिल्यानंतर कसे चित्र असेल याचे सादरीकरण केले. तसेच डीजी ठाणे प्रकल्पाची माहिती व सादरीकरण केले. या दोन्ही प्रकल्पांचे कौतुक करून डीजी ठाणे प्रकल्प पोलिसांना साहाय्यभूत ठरेल, असे सांगून पोलिसांकडून सर्वतोपरी साहाय्य करण्याची ग्वाही दिली.

First Published on: October 2, 2019 8:04 PM
Exit mobile version