कुलाबा, भांडुप वगळता हवेचे प्रदुषण झाले कमी

कुलाबा, भांडुप वगळता हवेचे प्रदुषण झाले कमी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मुंबईतील वायू प्रदुषणाची पातळी बऱ्याच प्रमाणात घटलेली पाहायला मिळाली आहे. रस्त्यांवरील वाहनांचे तसेच कंपन्या उद्योगधंदे बंद असल्याने तरंगणाऱ्या धुली कणांसह वायू प्रदुषणाचेही प्रमाण बऱ्याच प्रमाणात कमी झाले आहे. भांडुप आणि कुलाबा वगळता सर्वच ठिकाणी हवेचे प्रदुषण कमी झाल्याचे दिसून येते.

५ जून रोजीच्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘लॉक डाऊन’ काळातील मुंबईतील हवेच्या गुणवत्तेची माहिती देणारा अहवाल प्रशासनाने बनवला आहे.  महापालिकेच्या वायू वैविध्य सर्वेक्षण व संशोधन प्रयोगशाळा अंतर्गत मुंबईतील वायू गुणवत्ता पातळी नियमित शास्त्रीय पध्दतीने तपासली जाते. या प्रयोगशाळेच्या अखत्यारित ३ ठिकाणी वायू सर्वेक्षण केंद्र आणि ४ वाहन आधारित सर्वेक्षण केंद्र आहेत. याव्यतिरिक्त भारत सरकारच्या अखत्यारीतील उष्णकटिबंधीय हवामान शास्त्र विभाग (पुणे), भारतीय हवामान खाते आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्याद्वारे संयुक्तपणे राबविण्यात येत असलेल्या ‘सफर मुंबई’ या प्रकल्पांतर्गत ९ ठिकाणी स्वयंचलित वायु गुणवत्ता तपासणी केंद्रे देखील कार्यरत आहेत. लॉकडाऊनच्या कालावधीत बनवलेल्या या अहवालात या कालावधीत वायु प्रदूषण पातळीत लक्षणीय घट झाल्याचे नोंदविण्यात आले आहे.

जानेवारीमध्ये सर्व केंद्रावर तरंगणारे धुलीकरण हे ९४ ते २०५ मायक्रॉन-घनमीटर या टप्प्यात अर्थात निश्चित केलेल्या मानकांपेक्षा अधिक होती. परंतु मे महिन्यात हेच प्रमाण भांडुप वगळता इतर सर्व ठिकाणी २७ ते ६८ मायक्रॉन-घनमीटर एवढे खाली आलेली पाहायला मिळाली असल्याचा निष्कर्ष या अहवालात नमुद करण्यात आला आहे.

तर ओझोनचे प्रमाणे जानेवारीमध्ये सर्व केंद्रांवर ५ ते ४२ पिपिबी एवढ्या टप्प्यात होता. परंतु मेमध्ये हे प्रमाण ११ ते २१ पिपिबी इतके आढळून आले. केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाचे ओझोनचे निर्धारीत मानक हे ५० पिपिबी एवढे आहे. तर कार्बन मोनॉक्साईडच्या प्रदुषणाबाबत जानेवारीमध्ये सर्व केंद्रांवर ०७ ते १.२ पिपिएम या टप्प्यात होते. तर मेमध्ये हे प्रमाण ०.१ ते १.१ पिपिएम इतके दिसून आले. केंद्रीय नियंत्रण मंडळाने १.७ पिपिएम एवढे मानक निर्धारीत केले आहे. त्यामुळे यातही घट झाल्याचे दिसून येत आहे.

नायट्रोजन डायऑक्साईड बाबत केंद्रीय प्रदुषण  नियंत्रण मंडळाने  ४२.७ पिपिबी एवढे मानक  निर्धारीत केले आहे. जानेवारीमध्ये हे प्रमाण ११ ते ६९ पिपिबी या टप्प्यात होते. पण मे मध्ये हे प्रमाण सर्व केंद्रांवर माझगाव वगळता ३ ते ११ पिपिबी एवढे नोंदवले गेले. त्यामुळे या प्रमाणातही घट दिसून आली आहे. माझगावमध्ये ११ पिपिबी एवढी नोंद झाली आहे.

First Published on: June 4, 2020 11:39 PM
Exit mobile version