बोरिवली: RPF जवानांमुळे महिलेला मिळाली ३ लाखांहून अधिक रोख आणि दागिन्यांची बॅग परत

बोरिवली: RPF जवानांमुळे महिलेला मिळाली ३ लाखांहून अधिक रोख आणि दागिन्यांची बॅग परत

बोरिवली: RPF जवानांमुळे महिलेला मिळाली ३ लाखांहून अधिक रोख आणि दागिन्यांची बॅग परत

बोरिवली आरपीएच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे एका महिला प्रवासीला तिची दागिने आणि रोख असलेली बॅग परत मिळाली आहे. या बॅगेत दागिने आणि रोख असे मिळून जवळपास ३ लाख ८४ रुपये किंमतीचे सामान होते. बोरिवली रेल्वे पोलिसांच्या दक्षतेमुळे संबंधीत महिलेला ही बॅग परत मिळाली आहे. या हरवलेल्या बॅगेचा शोध घेत बोरिवली रेल्वे पोलिसांनी बॅगेतील वस्तूंची खातरजमा झाल्यावर त्या बॅगेतील मौल्यवान ऐवज संबंधीत महिलेल्या स्वाधीन केला. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. ही घटना २५ जुलै २०२१ रोजी उघडकीस आली.

नेहा निर्मल जैन ( वय २० ) असे या महिला प्रवासीचे नाव आहे. ही महिला प्रवासी ट्रेन नंबर ०४७०७ बिकानेर- दादर स्पेशल ट्रेनने प्रवास करत होती. दरम्यान ही ट्रेन बोरिवली स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक ७ वर थांबल्यानंतर ही महिला प्रवासीही आपल्या सामानासह खाली उतरली. या सामानात त्यांची मौल्यवान वस्तू आणि रोख असलेली एक काळ्या रंगाची बॅग होती. परंतु ही बॅग प्लॅटफॉर्मवरील दुसऱ्या प्रवाशाच्या बॅगेप्रमाणेच असल्याने ती बॅग चुकून तो दुसरा प्रवासी घेऊन गेला. त्यामुळे या संबंधीत महिलेला आपली बॅग हरवल्याचे समजले. त्यानंतर तात्काळ तिने बोरिवली आरपीएफ पोलिसांना बॅग चुकून दुसऱ्या प्रवाश्याकडे गेल्याची माहिती दिली.

यावेळी आरपीएफच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज तपासले असता या महिला प्रवासीची काळ्या रंगाची बॅग दुसरा एका प्रवासी कुलीच्या मदतीने घेऊन जात असल्याचे आढळले. त्या प्रवाश्याने ती बॅग बोरिवली रेल्वे स्थानकाच्या बाहेरील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाडीत ठेवल्याचेही सीसीटीव्हीमध्ये दिसले. मात्र त्या गाडीचा क्रमांक स्पष्ट दिसला नाही. यावेळी आरपीएफ अधिकाऱ्यांनी अधिक मेहनत घेत बॅग घेऊन जाणाऱ्या प्रवाश्य़ाची माहिती शोधून काढली. हा प्रवासी खार पश्चिम येथे राहणारा असून त्याचे नाव जागरण जैन असे आहे. यावेळी आरपीएफ जवानांनी जागरण जैन यांना चुकून त्यांच्या जवळ आलेली बॅग बोरिवली आरपीएफ स्थानकात आणण्यास सांगितली. यानंतर बॅग आणि दोन्ही प्रवाशांची खातरजमा करत आरपीएफ जवानांनी बॅग योग्य मालक नेहा यांच्या स्वाधिन केली.

या महिलेच्या बॅगेत ३ लाख ७५ हजार रुपये किंमतीचे दागिने, ५००० रुपयांची रोकड आणि ४००० रुपये किंमतीचे घड्याळ होते. या सामानची एकूण किंमत ३ लाख ८४ हजार रुपये इतकी आहे. आरपीएफ जवानांच्या या कौतुकास्पद कामगिरीचे दोन्ही प्रवाशांनी कौतुक केले आहे. तसेच पोलिसांची प्रयत्नांसाठी कृतज्ञता व्यक्त केली. उल्लेखनीय बाब म्हणजे मुंबई विभागातील आरपीएफ जवानांनी २०२१ मध्ये ३७६ प्रवाशांच्या हरवलेल्या ५३ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल योग्य प्रवाशांच्या स्वाधीन केला आहे.


 

First Published on: July 27, 2021 7:43 PM
Exit mobile version