मुंबईत महिलेची आत्महत्या; PMC बँकेत पैसे बुडाल्यानं होती तणावग्रस्त!

मुंबईत महिलेची आत्महत्या; PMC बँकेत पैसे बुडाल्यानं होती तणावग्रस्त!

PMC Bank : पीएमसी बँकेच्या खातेदारांना पूर्ण पैसे मिळणार, आरबीआयची घोषणा

पीएमसी बँकेतील गैरव्यवहारांनंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकेच्या व्यवहारांवर निर्बंध आणले. त्यामुळे बँकेच्या हजारो खातेदारांचा जीव टांगणीला लागला. आपले पैसे कधी मिळणार? या चिंतेत सध्या बँकेचे खातेदार असताना अनेक खातेदारांना नैराश्याने ग्रासल्याचंही काही प्रकरणांमधून समोर आलं आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या मुलुंडमध्ये राहणाऱ्या एका महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. सदर महिलेच्या कुटुंबीयानी पीएमसी बँकेत १५ लाख रुपये ठेवले होते. त्यामुळे आपले पैसे कधी परत मिळणार, या विवंचनेतून महिला नैराश्यग्रस्त झाल्याचं तिच्या कुटुंबीयांकडून समजतंय. मुंबई मिररने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

१ जुलै रोजी रचना सेठ या ४५ वर्षीय महिलेने राहत्या घरी आत्महत्या केली. त्यांचे पती विशाल सेठ एका हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. ‘पीएमसी बँक घोटाळ्याचं प्रकरण समोर आल्यापासून रचना तणावात होती. तणावामुळे ती मध्यरात्री देखील दचकून उठायची आणि रडायला लागायची. आम्हाला त्याचीच चिंता सतावत होती. अखेर तेच घडलं’, अशी प्रतिक्रिया विशाल सेठ यांनी दिली आहे.

दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचा देखील त्यांच्यावर मोठा परिणाम झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयाकडून मिळत आहे. ‘सुशांतच्या आत्महत्येपासून तिच्यावरचा ताण वाढला होता’, असं विशाल सेठ यांनी सांगितलं. या घटनेमुळे त्या अधिक नैराश्यग्रस्त झाल्याचं स्पष्ट होत आहे. दरम्यान, रचना सेठ यांना एक मुलगी देखील असून ती सध्या कॉलेजचं शिक्षण करत आहे. मात्र, या घटनेमुळे त्यांच्या संपूर्ण कुटुंबालाच धक्का बसला आहे.

First Published on: July 6, 2020 1:36 PM
Exit mobile version