उत्तर प्रदेशातील महिलेवर मुंबईत सामूहिक बलात्कार

उत्तर प्रदेशातील महिलेवर मुंबईत सामूहिक बलात्कार

प्रातिनिधिक छायाचित्र

उत्तर प्रदेशात आपल्या घरी रेल्वेने जाणाऱ्या एका महिलेवर काल रात्री लोकमान्य टिळक टर्मिनसजवळ सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात नेहरू नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीसांनी चार आरोपींना अटक केली आहे.

उत्तर प्रदेश येथे आपल्या गावी जाण्यासाठी एक महिला काल रात्री ११ वाजण्याच्या सुमारास कुर्ला रेल्वे स्थानकाहून पायी लोकमान्य टिळक टर्मिनसकडे पायी जात होती. दरम्यान लघुशंकेसाठी ती साबळे नगर येथील झाडीमध्ये गेली असता झाडीपलीकडे असलेले आरोपी सोनू तिवारी आणि निलेश बारसकर यांनी महिलेला जबरदस्ती ओढून घेतले. त्यानंतर तिथून जात असलेल्या आरोपी सिद्धार्थ वाघ आणि श्रीकांत भोगले यांनी देखील महिलेवर दुष्कर्म केले. आरोपींनी पीडित महिलेवर अत्याचार केल्यानंतर तिच्याकडील रोख तीन हजार आणि मंगळसूत्र खेचून नेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर घटनास्थळावरुन जाणाऱ्या एका महिलेने १०० नंबरवर फोन फिरवून पोलिसांना बोलवून घेतले आणि पीडित महिलेची मदत केली.

पोलीस घटनास्थळी आल्यानंतर स्थानिकांच्या मदतीने दोन आरोपींना तात्काळ अटक केली. तर उर्वरित आरोपींचा शोध घेऊन त्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

 

First Published on: January 21, 2020 1:43 PM
Exit mobile version