CCTV: तिकीट विचारलं म्हणून महिला टीसीलाच प्रवाशाची मारहाण!

CCTV: तिकीट विचारलं म्हणून महिला टीसीलाच प्रवाशाची मारहाण!

फुकट्या प्रवाशांवर आवर घालण्यासाठी रेल्वेकडून वारंवार कारवाई करण्यात येते. तसेच, प्रवाशांना आवाहन देखील करण्यात येतं. मात्र, तरीदेखील अनेक प्रवासी विनातिकीट प्रवास करताना दिसून येतात. अशा वेळी या प्रवाशांना आवर घालण्याचं मोठं काम रेल्वेच्या टीसींना करावं लागतं. मात्र, या टीसींनी प्रसंगी गंभीर परिणामांचा सामना देखील करावा लागतो. नेरूळ-खारकोपर रेल्वे स्थानकावर असाच एक प्रकार समोर आला असून एका विनातिकीट प्रवाशाला हटकणाऱ्या महिला टीसीलाच या प्रवाशाने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार इथल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या प्रकरणी धक्क्यात असलेल्या महिली टीसीने घटनेच्या १२ दिवसांनंतर आरपीएफकडे तक्रार केल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.

खोटं लपवण्यासाठी मारहाणीला केली सुरुवात

२८ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास सदर महिला टीसी नेरूळ-खारकोपर स्थानकावर तैनात होत्या. त्यांना प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरच्या एका पुरुष प्रवाशाचं वर्तन संशयास्पद आढळलं. त्यांनी त्याला हटकून तिकीटाची विचारणा केली, तेव्हा त्याच्याकडे तिकीटच नसल्याचं त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी प्रवाशाकडे विचारणा केली. तेव्हा आपण फक्त प्लॅटफॉर्मवर बसलो असून प्रवास करायचा नसल्याचं त्यानं सांगितलं. त्यानंतर आपल्याकडे प्लॅटफॉर्मचं तिकीट देखील नसून आपण रेल्वे कर्मचारी असल्याचं त्यानं सांगितलं. यावर ओळखपत्राची विचारणा केली असतान ओळखपत्र देखील न दाखवता या प्रवाशानं महिला टीसींवर अरेरावी सुरू केली.

अज्ञाताच्या शोधात पोलीस

सदर महिला टीसीने कारवाईसंदर्भात सांगितल्यानंतर मात्र या प्रवाशाने सदर महिला टीसीला धक्काबुक्की आणि मारहाण करायला सुरुवात केली. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या टीसीने केलेल्या तक्रारीनुसार या प्रवाशाने तिला जिवे मारण्याची धमकी देखील दिली. दरम्यान, दुपारची वेळ असल्याने या स्थानकात जास्त वर्दळ नव्हती. नेमका याचाच फायदा घेत त्या व्यक्तीने स्थानकातून पळ काढला. मात्र, अचानक झालेल्या हल्ल्याने आणि स्वत:वर ओढवलेल्या अतिप्रसंगामुळे महिला टीसीने धक्क्यातून स्वत:ला सावरत गुरुवारी, १० ऑक्टोबर रोजी आपल्या सहकार्‍यासह पनवेल जीआरपी येथे यासंदर्भात तक्रार नोंदवली. पोलिस आरोपीच्या शोध घेत आहेत.

First Published on: October 11, 2019 9:33 PM
Exit mobile version