WOMENS DAY : महिला धोरणावर बोलताना यशोमती ठाकूर भावुक; म्हणाल्या, माझ्या मुलांना…

WOMENS DAY : महिला धोरणावर बोलताना यशोमती ठाकूर भावुक; म्हणाल्या, माझ्या मुलांना…

मुंबई : आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विधानसभा कामकाजात महिला लोकप्रतिनिधींना अधिक प्राधान्य देण्यात आले. यावेळी राज्याच्या माजी महिला व बालकल्याण मंत्री तसेच काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर (yashomati thakur) विधानसभेत बोलताना भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी आपल्या भाषणात महिला धोरण आणि कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी यात होणारी तफावत सांगितली.

तक्रार करताना त्यांनी म्हटले की, माझ्या पतीचे १८ वर्षांपूर्वी निधन झाले, पतीच्या निधनानंतर मला खूप संघर्ष करावा लागला. पतीच्या निधनानंतर माझ्या पोरांची हक्काची संपत्ती त्यांच्या नावावर करण्यासाठी माझ्यासारख्या महिलेला आपल्या देशात अजूनही संघर्ष करावा लागत असल्याचे सांगताना त्यांच्या डोळ्यात अश्रू होते.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विधानसभेच्या आजच्या कामकाज पत्रिकेत सर्वपक्षीय महिला आमदारांच्या लक्षवेधी सूचना चर्चेला ठेवण्यात आल्या होत्या. लक्षवेधी चर्चेवर बोलण्यासाठी उभ्या राहिलेल्या यशोमती ठाकूर (yashomati thakur) यांनी सुरुवातीलाच महिला धोरण किती चुकीच्या पद्धतीने राबवण्यात येत आहे, हे त्यांनी स्पष्टच सांगितले. महिला धोरण आणि कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी यातली तफावत सांगताना त्या भावुक झाल्या होत्या.

मंत्री असूनही मला त्रास झाला, तर सामान्य महिलांचे काय…
माझे पती गेल्यावर मला सर्वच बाबतीत संघर्ष करावा लागला. मी मोठ्या घरातील होते, माझे लग्नही मोठ्या घरात झाले. सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचा विचार केला तर माझी परिस्थितीही चांगली होती. असे असतानाही माझ्या मुलांची नावं सातबारावर लावण्यासाठी माझ्यासारख्या महिलेला आपल्या देशात अजूनही संघर्ष करावा लागतो.
बालकल्याणमंत्री राहिलेल्या यशोमती ठाकूर (yashomati thakur) महिलांबद्दलच्या कायद्याची ही स्थिती सभागृहाच्या पटलावर मांडताना भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. माझ्यासारख्या बालकल्याणमंत्री असलेल्या महिलेला जर हा त्रास झाला, तर सर्वसामान्य महिलांना काय त्रास होत असेल याचा विचार सरकार करू शकत नाही, असेही यशोमती ठाकूर म्हणाल्या.

First Published on: March 8, 2023 10:12 PM
Exit mobile version