जागतिक क्षयरोग दिवस : टीबी हरणार; देश जिंकणार

जागतिक क्षयरोग दिवस : टीबी हरणार; देश जिंकणार

जागतिक क्षयरोग दिन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या २०२५ पर्यंत क्षयमुक्त भारत करण्याचा निर्धार केला असताना आता याच मोहिमेत युवकांनी ही पुढाकार घेतला आहे. दरवर्षी २४ मार्च या दिवशी जागतिक क्षयरोग दिवस पाळला जातो. जागतिक क्षयरोगाच्या निमित्ताने चर्चगेटच्या एसएनडीटीच्या द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनींनी शिवडी टीबी हॉस्पिटलमध्ये ‘टीबी हरणार, देश जिंकणार’ यासाठी रॅलीचं आयोजन केलं होतं. कुटुंबातील एखाद्याला टीबी आजार झाला की, संपूर्ण कुटुंबाची हेळसांड होते. शिवाय, हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे तो खोकल्यातून पसरतो. त्यामुळे तो दुसऱ्यांनाही होऊ शकतो. याविषयी आजही तितकीशी जनजागृती नसल्याकारणाने रुग्ण किंवा नातेवाईक तेवढी काळजी घेत नसल्याचं दिसून येतं.

टीबीत विशेष काळजी घ्यावी 

राज्य सरकारकडून टीबी रुग्णांची संख्या कमी व्हावी आणि त्यासोबतच मृत्यूचं प्रमाण कमी व्हावं यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पण, टीबीच्या वाढत्या संसर्गामुळे रुग्ण हॉस्पिटलमध्ये जाण्यास घाबरतात. त्यामुळे टीबी आजाराला घाबरुन न जाता रुग्णांची नातेवाईकांनी कशी काळजी घ्यावी, सोबतच त्यांना कशापद्धतीने आहार द्यावा, याचं मार्गदर्शन करण्यासाठी या विद्यार्थीनींनी अनेक प्रकल्प तयार केले आहेत. प्रकल्पात टीबी रुग्णांचा आहार, रुग्णांनी तोंडाला मास्क लावणं, त्यांच्या गोळ्यांचे डोस, लसीकरण अशा अनेक माहितीचा समावेश करण्यात आला आहे.

गेल्या आठवडाभरापासून आम्ही या प्रकल्पावर काम करत होतो. ग्रामीण भागातील लोकांना टीबी आजाराबाबत माहिती नसते. त्यामुळे रुग्णांची कशापद्धतीने काळजी घ्यावं हे ही माहित नसतं. शिवडी टीबी हॉस्पिटलमध्ये अनेक भागातून रुग्ण उपचारांसाठी येतात. त्यामुळे जागतिक क्षयरोगाच्या दिनानिमित्ताने आम्ही सर्वांना इथे येणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मार्गदर्शन करत आहोत.
– वैशावी इंगोले, विद्यार्थीनी, एसएनडीटी

टीबी या आजारामध्ये ताप येणं, खोकला लागणं, वजन घटणं, अशक्त वाटणं अशी अनेक लक्षणे आढळतात. ही लक्षणे सतत आढळल्यास डॉक्टरांची भेट घेऊन सल्ला आणि उपचार घेणं गरजेचं असल्याचं एसएनडीटीच्या विद्यार्थीनी नातेवाईकांना समजावत होत्या.

First Published on: March 23, 2019 3:18 PM
Exit mobile version