CoronaVirus : वरळी, प्रभादेवीपाठोपाठ धारावी, दादर, माहिम हजार पार

CoronaVirus : वरळी, प्रभादेवीपाठोपाठ धारावी, दादर, माहिम हजार पार

वरळी, प्रभादेवीच्या जी-दक्षिण विभागात कोरोनाग्रस्तांचा आकडा हजारांच्यावर पोहोचलेला असतानाच आता धारावी, माहिम व दादर या जी-उत्तर विभागानेही हजारी पार केली. जी-उत्तर विभागातील धारावीमध्ये ८३३ रूग्ण तर दादर व माहिममध्ये अनुक्रमे १०५ व ११२ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. मात्र, धारावीतील रुग्णांची संख्या आता कमी होत असून योगायोगाने दुसऱ्या दिवशीही २५ रुग्ण आढळून आले आहेत.

धारावीमध्ये मागील चार दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. शनिवारी, महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त इक्बाल चहल यांनी धारावीला भेट देवून बाधित क्षेत्रातील रहिवाशांशी संवाद साधत सेवा सुविधांचा आढावा घेतला. मुकुंद नगर येथे दिवसभरात पाच रुग्ण आढळून आले आहेत. याच ठिकाणी आयुक्तांनी भेट दिली होती. तर प्रेम नगर, केला बखर, राजीव गांधी नगर, ९० फुटी रस्ता,  धोरवाडा, मुस्लिम नगर, न्यू म्युनिसिपल चाळ, सोशल नगर,  माटुंगा लेबर कॅम्प, क्रॉस रोड, कुंभार रोड, केरू शेट चाळ,  वोक टॉवर, विवेकानंद सोसायटी, साईबाबा नगर, साईबाबा नगर, राजीव गांधी चाळ, शिव शक्ती चाळ आदी ठिकाणी रुग्ण आढळून आले आहे. तर आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत २७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २२२ जणांना घरी सोडण्यात आले आहे.

माहिममध्ये दिवसभरात पाच रुग्ण

माहिममध्ये आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या ११२वर पोहोचली असून ५ जणांचे मृत्यू झाले आहेत. दिवसभरात पाच नवीन रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये माहिम बस आगार, कापडा बाजारमधील अरिहंत हॉटेल, रहेजा क्वाटर्स, टि.एच.कटारिया मार्ग आदी ठिकाणी रुग्ण आढळले.

दादरनेही पार केली शंभरी

धारावी, माहिममधील रुग्णांची संख्या कमी होत असतानाच दादरमधील रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. दादरमधील महापालिका सफाई कामगारांची वसाहत असलेल्या कासारवाडीत एका दिवसांत ८ कोरोनाचे रुग्ण आढळले. त्याखालोखाल स्वराज्य सोसायटीमध्ये तीन रुग्ण तसेच बाळ गोविंददास रोड, महापालिका वसाहत, कालिका दर्शन, लोकमान्य नगर, सर्वोदय, हेदवकरवाडी, बारी चाळ, आदी ठिकाणी दिवसभरात १८ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या १०५ वर पोहोचली असून आतापर्यंत या भागात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत १७ जणांना घरी सोडण्यात आले आहे.

First Published on: May 9, 2020 9:28 PM
Exit mobile version