प्रेमसंबंधातून तरुणाचे अपहरण करुन हत्या, कांदिवलीतील घटना

प्रेमसंबंधातून तरुणाचे अपहरण करुन हत्या, कांदिवलीतील घटना

प्रातिनिधिक छायाचित्र

प्रेमसंबंधातून दिपक हनुमंत कट्टूकर (Deepak Hanumant Kattukar) या 20 वर्षांच्या तरुणाचे अपहरण (kidnapping) करुन हत्या ( murder) झाल्याची घटना कांदिवली (Kandivali) परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी अपहरणासह हत्येचा गुन्हा नोंद होताच पळून गेलेल्या सुरज दिपचंद विश्वकर्मा (Suraj Dipchand Vishwakarma) या 27 वर्षांच्या आरोपीस कांदिवली पोलिसांनी अटक केली आहे. सुरजला बोरिवलीतील लोकल कोर्टाने 26 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

लक्ष्मी हनुमंत कट्टूकर ही महिला घरकाम करीत असून ती सध्या कांदिवलीतील संतोषी माता मंदिराजवळील शिवाजी रोडच्या रामजी सोलंकी फुलाबाई मगदूम पवार चाळीत राहते. तिचा दिपक हा मुलगा आहे. त्याचे त्याच परिसरात राहणार्‍या एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. दुसरीकडे या तरुणीचा नातेवाईक असलेला सुरज हादेखील या तरुणीवर एकतर्फी प्रेम करीत होता. मात्र या दोघांच्या प्रेमसंबंधाला त्यांच्या घरच्या विरोध होता. त्यात त्याला या तरुणीचे दिपकसोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे त्याच्या प्रेमात अडसर असलेल्या दिपकची त्याने हत्येची योजना बनविली होती.  त्याने दिपकला 12 मे रोजी कांदिवली रेल्वे स्थानकाजवळ बोलाविले. तिथेच त्याला त्याची हत्या करायची होती, मात्र त्याची योजना यशस्वी झाली नाही. त्यामुळे ते दोघेही ट्रेनमधून कांदिवली येथून भाईंदरला गेले. तिथे त्याने अपहरण केलेल्या दिपकला भाईंदर खाडीवरुन खाली फेकून दिले होते. त्याला पोहता येत नसल्याने त्याचा मृत्यू झाला.

दुसरीकडे दिपक हा रात्री उशिरापर्यंत घरी आला नाही म्हणून त्याची आई लक्ष्मीने त्याचा सर्वत्र शोध घेतला. त्याच्या मित्रांसह नातेवाईकाकडे चौकशी केली. मात्र तो कुठेच सापडला नाही. त्यामुळे तिने कांदिवली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे त्यांचा मुलगा मिसिंग असल्याची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी मोठी व्यक्ती हरविल्याची नोंद करुन तपासाला सुरुवात केली होती. या गुन्ह्यांचा तपास करताना पोलीस निरीक्षक सदाशिव सावंत, पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत पवार व अन्य पोलीस पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. या फुटेजसह तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी सुरज विश्वकर्मा या संशयित तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत त्यानेच दिपकचे अपहरण करुन नंतर त्याची हत्या केल्याची कबुली दिली. त्याचे ज्या तरुणीवर एकतर्फी प्रेम होते, तिच्यासोबत दिपकचे प्रेमसंबंध होते. तो त्याच्या प्रेमात अडसर होता. त्यातून त्याने त्याचे अपहरण करुन त्याला भाईंदर खाडीवरुन फेकून दिले होते.

दिपकचा मृतदेह वसईजवळील समुद्रकिनार्‍यावर पोलिसांना सापडला होता. त्यामुळे वसई पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करुन हा तपास नंतर कांदिवली पोलिसाकडे वर्ग केला होता. तपासादरम्यान ही माहिती समोर आली आणि काही तासांत पोलिसांनी कुठलाही पुरावा नसताना मुख्य आरोपीस अटक केली. आरोपीला मंगळवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाने त्याला गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

First Published on: May 24, 2022 9:30 PM
Exit mobile version