मंत्रालयात पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न

मंत्रालयात पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न

मंत्रालयामध्ये पुन्हा एकदा आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आल्याचं समोर आलं आहे. एका तरुणीने हा प्रयत्न केला असून मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावरून या तरुणीने उडी मारली. मात्र, मंत्रालयात मधल्या जागेमध्ये बसवण्यात आलेल्या संरक्षक जाळ्यांमुळे या तरुणीचा जीव वाचला आहे. प्रियंका गुप्ता असं या तरुणीचं नाव असून तिच्या नवऱ्याविरोधात एका प्रकरणामध्ये भादंवि ३५३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्यामुळे त्याचा विरोध करण्यासाठी तिने हे पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. सदर तरुणी उल्हासनगर येथे राहणारी असून तिला पुढील उपचारांसाठी सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुपारच्या सुमारास ही घटना घडली. या तरुणीने उडी मारल्यानंतर लागलीच पोलिसांनी तिला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यासाठी दोन कर्मचाऱ्यांनी देखील या जाळीवर उडी घेत या तरुणीला बाहेर काढलं.

उल्हासनगर – २ येथील अमन टॉकीजजवळ निर्मला ज्यूस सेंटर आहे. हे ज्यूस सेंटर ८ डिसेंबर रोजी मध्यरात्री २ वाजेपर्यंत सुरू असल्याची तक्रार मध्यवर्ती पोलीस ठाण्याला मिळाली होती. ही तक्रार मिळाल्यानंतर पोलीस पथक ज्यूस सेंटरवर कारवाईसाठी गेले होते. यावेळी ज्यूस सेंटरचे मालक पवन गुप्ता, पवनची पत्नी प्रियांका गुप्ता आणि नीता आवाडे या महिलेने पोलिसांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपींना ताब्यात घेऊन जात असताना त्यांनी पोलीस वाहनांच्या काचा फोडून स्वतःला जखमी करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या प्रकरणी आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

पोलिसांनी २० हजारांचा हफ्ता मागितला होता?

याप्रकरणी ज्यूस सेंटरचा मालक पवन गुप्ता आणि त्याची पत्नी प्रियांका गुप्ता यांनी आरोप केला आहे की पोलिसांनी आम्हाला मारहाण केली असून दर महिना २० हजार रुपये हफ्ता मागितला होता. मात्र, आम्ही पैसे देण्यास नकार दिल्याने त्यांनी ही कारवाई जाणीवपूर्वक केली. या आरोपाचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर व्हायरल केला होता. या प्रकरणात प्रियांका गुप्ता आणि नीता आवाडे यांना जमीन मिळाला आहे, तर प्रियंकाचा पती पवन गुप्ता अद्यापही तुरुंगात आहे. या प्रकरणी पोलिसांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी प्रियांका आज मंत्रालयात गेली असताना तिने आत्महत्येचा प्रयत्न केला.
First Published on: December 13, 2019 4:56 PM
Exit mobile version