उल्हासनगरात दिवसाढवळ्या तरुणाची हत्या

उल्हासनगरात दिवसाढवळ्या तरुणाची हत्या

उल्हासनगरमध्ये एका ३६ वर्षीय तरुणाची अज्ञातांनी दिवसाढवळ्या भरचौकात हत्या केली आहे. उल्हासनगर – येथील आवत चौकामध्ये ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तरुणाचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी मध्यवर्ती रुग्णालयात पाठविला आहे .

विशिष्ठ यादव (३६ वर्ष) असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. उल्हासनगर – २ परिसरातील आझादनगर परीसरात तो राहत होता. विशिष्ठ हा सेल्समनचे काम करीत होता. आज दुपारी १ वाजताच्या सुमारास तो उल्हासनगर – येथील आवत चौकाजवळ कामानिमित्त आला होता. त्याच दरम्यान अज्ञात इसमांनी तीक्ष्ण हत्यारांने विशिष्ठवर हल्ला केला. या हल्ल्यात विशिष्ठ गंभीररित्या जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. उल्हासनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून विशिष्ठचा मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी मध्यवर्ती रुग्णालयात पाठवला आहे .

पुढील तपासासाठी गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस, मध्यवर्ती पोलीस, उल्हासनगर पोलीस ठाण्याचे पोलीस आरोपीच्या तपासकामी लागले असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली जात आहे. विशिष्ठ यादव याचा भाऊ ब्रिजेश यादव याने आरोप केला की, ‘ही हत्या पूर्ववैमनस्यातून झालेली आहे. आमच्या घराजवळ राहणाऱ्या काही व्यक्तींनी अनेकदा मला आणि माझ्या भावाला मारहाण केली होती. आम्ही सात -आठ वेळा याबाबत पोलिसात तक्रार केली होती. या व्यक्तींपासून आमच्या जीवाला धोका होता.४ दिवसांपूर्वी आम्ही पोलीस संरक्षण देखील मागितले होते. मात्र पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे माझ्या भावाला जीव गमवावा लागला.’ या संदर्भात उल्हासनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यास पोलिसांनी नकार दिला आहे.

First Published on: June 17, 2019 10:35 PM
Exit mobile version