दिवाळे गाव हा माझा पायलट प्रोजेक्ट – आमदार मंदा म्हात्रे

दिवाळे गाव हा माझा पायलट प्रोजेक्ट – आमदार मंदा म्हात्रे

भाजपमध्ये महिलांचा सन्मान होत नसल्याचा मंदा म्हात्रेंचा आरोप; यशोमती ठाकूर यांच्यासमोरच केली खंत व्यक्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशातील गावांचे स्मार्ट स्वप्न पाहिले आहे. तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील गाव दत्तक योजने अंतर्गत बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबईतील दिवाळे गाव हे दत्तक घेतले आहे. त्यानुसार मंदा म्हात्रे यांच्याकडून बेलापूर विभागातील दिवाळे गाव स्मार्ट व्हावे, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यानुसार दिवाळे गावाचा विकास करण्यात येणार आहे. त्याबाबतचा पाहणी दौरा आमदार मंदा म्हात्रे व पालिका अधिकाऱ्यांकडून नुकताच करण्यात आला. स्मार्ट व्हिलेज अंतर्गत भव्य, सुसज्ज सर्व सुविधांयुक्‍त मच्छी मार्केट, उद्याने, मासे सुकवण्यासाठी प्लॅटफॉर्म, स्टेज, समाज मंदिर, स्वाध्याय हॉल, प्रसाधनगृहे, लहान मुलांकरता खेळणी, विरंगुळा केंद्र, गजेबो गार्डन, बहउद्देशीय इमारत, ओपन जिम, चारचाकी वाहनतळ, भाजी व फळ मार्केट तसेच गावाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्याकरता १५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. याकरता आमदार मंदा म्हात्रे यांच्या आमदार निधीची तरतूदही करण्यात येणार आहे.

दिवाळे गावाला पार्किंगच्या समस्येने वेढळे असताना भव्य कार पार्किंगमुळे ट्रॅफिकची समस्या सुटणार आहे. दिवाळे गाव हा माझा पायलट प्रोजेक्ट असून त्याच धर्तीवर बेलापूर मतदारसंघातील इतर गावेही स्मार्ट व्हिलेज बनवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
– मंदा म्हात्रे, आमदार, बेलापूर 

दिवाळे गाव हे स्मार्ट व्हिलेज म्हणून तयार होणार असून त्याअंतर्गत अनेक ‘स्मार्ट’ उपक्रम राबवण्यात येणार आहेत. त्यातून रोजगार निर्मिती होणार असून स्थानिकांना त्यात प्राधान्य मिळणार आहे. चांगले शिक्षण, आरोग्य सुदृढ होण्यास मदत मिळणार आहे. या माध्यमातून स्वच्छता व सार्वजनिक उपक्रमाला चालना मिळणार आहे. तसेच माजी मख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या गाव दत्तक योजनेच्या माध्यमातून २००४ सालापासून दिवाळे गाव हे मी दत्तक घेतले असून या गावांमध्ये मी अनेक जेट्टी उभारल्या आहेत. या गावाच्या विकासासाठी गेल्या अनेक वर्षांपासून अनेक कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. आता हे गाव स्मार्ट व्हिलेज म्हणून तयार होणार असल्याने स्थानिकांना रोजगार मिळणार आहे, चांगले शिक्षण, आरोग्य सुविधा मिळणार आहेत. सार्वजनिक उपक्रमाला चालना मिळणार आहे, असे मंदा म्हात्रे यांनी सांगितले. यावेळी भाजपा महामंत्री निलेश म्हात्रे, माजी नगरसेविका भारती कोळी, नवी मुंबई महापालिका शहर अभियंता संजय देसाई, कार्यकारी अभियंता अजय संख्ये, विद्युत विभागाचे सुनील लाड, बेलापूर विभाग अधिकारी डॉ. मिताली संचेती, संजय पाटील, कैलास गायकवाड, अनंता बोस तसेच असंख्य महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.

हेही वाचा –

Santosh Parab Attack Case: नितेश राणेंना दोन दिवसांची पोलीस कोठडी

First Published on: February 2, 2022 10:06 PM
Exit mobile version