नेरुळ येथे शुक्रवारपासून गावदेवी यात्रोत्सव

नेरुळ येथे शुक्रवारपासून गावदेवी यात्रोत्सव

नवी मुंबई: नेरुळगावच्या दोन दिवसीय जत्रेस यावर्षी चैत्र कृष्ण प्रतिपदा म्हणजेच ७ एप्रिल पासून सुरुवात होत आहे.
जत्रा म्हणजे सर्व जाती-धर्माच्या लोकांमध्ये एकोपा निर्माण करण्याचे प्रभावी साधन असून किरकोळ व्यापारी आणि आदिवासी बांधवांच्या उत्पन्नाचा हा हक्काचा स्त्रोत. मात्र लागोपाठ तीन वर्षे जत्राच न भरल्याने या घटकाच्या उदर निर्वाहावर गदा आली होती परंतु या वर्षी कोरोनाचं सावट दूर झाल्यानं नवी मुंबईत २७ मार्च पासून सुरु झालेल्या जत्रोत्सवामध्ये नवी मुंबईत सर्वत्र आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले पहावयास मिळत आहे.
परिसरातील किंवा गाव – खेड्यातील लोकांनी एकत्र येऊन एखाद्या ग्रामदैवताचा उत्सव साजरा करण्याची पद्धत म्हणजे जत्रा होय. जत्रा हा खरे तर आनंदोत्सवच असतो. देव दर्शन, पालखीची मिरवणूक, तरवे काढणे, तुळा करणे, मानाच्या काठ्या काढणे या बरोबरच कुस्त्यांचे फड, तमाशाची बारी, दशावतार, नाटके, लेझीम नृत्य, शोभेच्या दारुची आतषबाजी, भंडाऱ्याची उधळण, बाजारात फेरफटका मारणे असा साराच जल्लोष म्हणजे जत्रोत्सव होय. जत्रेत खेळणी, बांगड्या, कपडे, मिठाईची, कपड्यांची दुकाने यांची तर रेलचेल असते. पूर्वी जत्रेत ग्रामदैवताला बकरा किंवा कोंबड्याचा बळी देण्याची प्रथा सर्वत्र रुढ होती परंतु कालपरत्वे ही प्रथा बंद झाल्याने पूर्वी ग्रामदैवतांना दिला जाणारा मांसाहाराचा नैवद्य अलिकडे पूर्णतः शुद्ध शाकाहारावर आला आहे. जत्रा ही संप्रदायिक एकता व एकात्मतेचं प्रतिक असून या माध्यमातून विविध जाती धर्माची हजारो लोकं एकत्र येतात. याच बरोबर या माध्यमातून ग्रामसंस्कृती, लोककला व लोक परंपरा जपण्याचं महत्वाचं कार्यही या जत्रेच्या माध्यमातून होत असतं. महाराष्ट्रात विशेषतः माघ, फाल्गुन व चैत्र हे तीन महिने जत्रांचे असतात. हा तीन महिन्यांचा कालावधी म्हणजे गावो – गावचे लहान – सान फेरीवाले, पाळणेवाले, तमासगिर विविध प्रकारचे कलावंत, ग्राम कारागीर यांना सुगीचे दिवस असतात.
नवी मुंबईत विशेषतः चैत्र महिन्यातच जत्रा भरल्या जातात. कार्ला येथील एकविरा देवीची चैत्र शुद्ध सप्तमीची जत्रा झाली की गावो – गावच्या जत्रांना उधाण येते.

नेरुळगावची गावदेवी म्हणजेच रांजनदेवी, करंजदेवी
नेरुळगावची गावदेवी म्हणजेच रांजनदेवी व करंजदेवी हे नवी मुंबईवासीयांचं एक महत्वाचं व जागृत श्रद्धास्थान आहे. नेरुळगावच्या गावदेवीची नवसाला पावणारी, हाकेला धावणारी अशी ख्याती असून या गावदेवीचा दोन दिवसीय जत्रोत्सव आज शुक्रवार पासून मोठ्या उत्साहात सुरु होत आहे.नेरुळगावच्या जत्रेत पूर्वी विविध प्रकारच्या मिठाई बरोबरच रान मेव्याची रेलचेल पहावयास मिळत असे. त्याच बरोबर रानमेवा विकणाऱ्या आदिवासी महिलांची जत्रेतील उपस्थितीही प्रकर्षाने नजरेत भरत असे. ताडगोळे, रांजणं, करवंद, जांभळं, विविध प्रकारचे स्थानिक आंबे हा अस्सल रानमेवा जत्रेत विकताना या परिसरातील आदिवासी महिला आवर्जून दिसत असत परंतु शहरीकरणाच्या व स्पर्धेच्या भाऊगर्दीत आज खूपच कमी आदिवासी महिला रानमेवा विकताना पहावयास मिळतात.

जत्रेत हमखास दिसणारी नाटकं हळूहळू कालबाह्य
जत्रा आणि नाटक पूर्वी जत्रा म्हणजे नाटक असे येथे समीकरण होते. १९२५ साली करावे गावात सर्वप्रथम गजानन नाट्य समाज नावाची नाटक कंपनी सुरु झाली आणि तेव्हा पासूनच येथे खऱ्या अर्थाने नाटकांना सुरुवात झाली. गावोगावी खास जत्रेसाठी सामाजिक, पौराणिक, ऐतिहासिक व संगीत नाटके बसविली जाऊ लागली. नेरुळगावही यास अपवाद नसून नेरुळगावात आम्ही एकशे पाच, स्वर्गावर स्वारी, वीर विडंबन, लाडकी लक्ष्मी, राजा हरीचंद्र, कृष्णार्जुन युद्ध, सीता स्वयंवर, संगीत शारदा, सिंहाचा छावा, सावित्री, वत्सला हरण, रामराज्य वियोग, अशी तिन्ही आळ्यांमध्ये अनेक नाटके बसविली जात असत. या नाटकात काम करणारे सर्व कलावंत हे नेरुळगावतीलच असत हे विशेष होय परंतु १९८० च्या दशकात येथे दूरदर्शनचा जमाना आला, त्यानंतर हळूहळू शहरी करणास सुरुवात झाली तसा चित्रपटांचा जमाना आला. तशा लोकांच्या आवडी निवडीही बदलत गेल्या आणि नेरुळगावतच नव्हे तर गावोगावच्या जत्रेत हमखास दिसणारी नाटकं हळूहळू कालबाह्य होत गेली.

पालखीची टाळ – मृदंगाच्या गजरात रात्रभर वाजत – गाजत मिरवणूक
चैत्र शुद्ध पौर्णिमा म्हणजेच श्री हनुमान जन्मोत्सव. या हनुमान जन्मोत्सवानिमित्त नेरुळगावात मारुतीरायाचा पालखी सोहळाही येथे फार मोठ्या उत्साहात संपन्न होतो. मारुतीरायाच्या पालखीची टाळ – मृदंगाच्या गजरात रात्रभर वाजत – गाजत मिरवणूक काढली जाते. सासरी गेलेल्या लेकी – बाळीही या सणासाठी आवर्जून माहेरी येतात. यात गावातील हजारो आबालवृद्ध तहान भूक विसरुन मोठ्या भक्तीभावाने सहभागी सहभागी होतात. जत्रोत्सवापूर्वी गावात आठवडाभर अगदी भक्तिमय वातावरणात हरिपाठ, प्रवचन, कीर्तन याचबरोबर चार दिवसीय भजन महोत्सवही रंगला जातो. यात ठाणे रायगड जिल्ह्यातील नामवंत भजन कलावंत आवर्जून हजेरी लावतात.

देवीच्या गाभाऱ्यात तुळा करण्याची परंपरा
नवी मुंबईत आज मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाले असले तरीही नेरुळगावच्या गावदेवीच्या जत्रेत आजही जुन्या रुढी परंपरा प्रकर्षाने पहावयास मिळतात. येथे तरवे काढण्याची एक आगळी वेगळी प्रथा असून ही प्रथा फारसी इतरत्र कुठेही पहावयास मिळत नाही. जत्रेच्या दिवशी गुढ्या – तोरणे लावून मानाच्या काठ्या काढल्या जातात. गावदेवीला नवस बोलले जातात, नवस फेडले जातात. देवीच्या गाभाऱ्यात तुळा करण्याची परंपरा असून हे सर्वच दृश्य अगदी विलोभनीय असते. नेरुळगावच्या गावदेवीच्या अशा या जत्रोत्सवास दरवर्षी पंचक्रोशीतील एक लाखाहून अधिक भाविक हजेरी लावतात.

नेरुळगावची गावदेवी हे एक जागृत श्रध्दास्थान असून याची प्रचिती नेहमीच येथील भाविक – भक्त घेत असतात. गावदेवी ही आमची रक्षणकर्ती असल्याची आमची श्रद्धा असल्याने दरवर्षी चैत्र कृष्ण प्रतिपदा व द्वितीयेला संपूर्ण गाव एकत्र येऊन देवीला मान – पान देत असतो. हाच अमुचा जत्रोत्सव होय. गावची ही परंपरा सुमारे साडेतीनशे वर्षांपासून आजही अखंडपणे सुरु आहे.
– ह.भ.प. नारायण पाटील
माजी अध्यक्ष – ग्रामदेवता मंदिर ट्रस्ट. नेरुळगाव

First Published on: April 6, 2023 9:45 PM
Exit mobile version