रायगड जिल्ह्यात श्री गणरायाला भावपूर्ण निरोप

रायगड जिल्ह्यात श्री गणरायाला भावपूर्ण निरोप

 

अलिबाग: दहा दिवसाच्या उत्साहानंतर जड अंतःकरणाने गुरुवारी रायगड जिल्ह्यात बाप्पाला निरोप देण्यात आला. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’…. ‘ मंगलमूर्ती मोरया’…. ‘गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला’, ‘एक-दोन-तीन-चार, गणपतीचा जयजयकार’… अशा घोषणांनी परिसर निनादून गेल्याचे चित्र सर्वत्र होते. विसर्जन स्थळी मूर्ती आणताच तेथे आरती, पूजा करीत नदी, तलाव, व समुद्रात मुर्तींचे विसर्जन करण्यात आले. यावेळी गणरायाला निरोप देण्यासाठी भाविकांच्या आलोट गर्दीबरोबरच वरूणराजाने देखील हजेरी लावली तर बाप्पांना निरोप दिल्यानंतर भाविक अत्यंत भावूक होतच माघारी परतत असल्याचे भावनिक चित्र पहावयास मिळाले. अनंत चतुर्दशीच्या दिवशी जिल्ह्यात १७ हजार ५४३ मुर्तींचे विसर्जन झाले. त्यात घरगुती एक हजार ७३९३ व सार्वजनिक १५० गणेशमुर्तीचा समावेश आहे.
गणेशमुर्तीची प्रतिष्ठापना १९ सप्टेंबर रोजी झाली होती.गेली दहा दिवस बाप्पाची मनोभावे पूजा करण्यात आली. जिल्ह्यातील काही भागांमध्ये मंडळाच्यावतीने सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम राबवून जनजागृती करण्याचा प्रयत्न आला आहे. दहा दिवसाच्या बाप्पाला गुरुवारी वाजत गाजत निरोप देण्यात आला. ढोल ताशांच्या गजरासह पारंपारिक वाद्यांच्या तालावर नाचत दुपारी चारनंतर जिल्ह्यातील अलिबागसह अनेक भागात मिरवणूक काढण्यात आली. दुपारनंतर पावसाची रिपरिप सुरु झाल्याने भक्तांच्या आनंदात खंड पडण्याची भिती निर्माण झाली होती. मात्र त्यावर मात करीत भर पावसात भिजत भाविकांनी मिरवणुकीत सहभाग घेतला. काही ठिकाणी सायंकाळी तर काही ठिकाणी रात्री अकरा तसेच काही ठिकाणी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास गणेशुर्तींचे विसर्जन करण्यात आले.

कडक पोलीस बंदोबस्त
अनंत चतुर्दशीनिमित्त दहा दिवसाच्या गणेशमुर्तींचे विसर्जन आनंदात व शांततेत व्हावे यासाठी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागासह शहरी भागात कडेकोट बंदोबस्त ठेवला. एक अपर पोलीस अधीक्षक, नऊ पोलीस उपविभागीय अधिकारी, २६ पोलीस निरीक्षक, १३२ सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, एक हजार ३३४ पोलीस अंमलदार, दोन आरसीपी, एक अतिशिघ्र कृती दल, सात स्ट्रायकींग फोर्स, २६५ होमगार्ड, व दोन राज्य राखीव पोलीस दलाचे पथक तैनात करण्यात आले होते. गर्दीमध्ये कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी साध्या वेशात पोलीस नागरिकांमध्ये सामील झाले होते. महिलांची छेडछाड करणारे, कायदा व सुव्यवस्था बिघडविणार्‍यांवर पोलिसांनी नजर ठेवली होती.

मुरुडमध्ये वरुणराजाची हजेरी

मुरुड: शहरात गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यास सुरुवात झाली आणि वरुणराजाने जोरदार हजेरी लावल्याने गणेशभक्तांचा थोडाफार हिरमोड झाला तरी गणेश भक्तांनी वरुणराजाचा स्वागत करुन रस्तावरुन हातगाडीवर तर कोणी टेम्पोत गणपती वाजत-गाजत जल्लोषात भक्तीमय भावात विसर्जन सोहळा पार पाडला. मुरुड पोलिस ठाण्यात हाद्दीत २२९३गणपती विसर्जन मुरुड समुद्रकिनारी, शिघ्रे नदीत, अंबोली नदीत, आगरदांडा समुद्राकिनारी निरोप देण्यात आले. सुप्रसिद्ध डॉ.राज कल्याणी यांचा मानाचा गणपती बाप्पाच्या विसर्जन करीता नाशिक ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.त्यावेळी मुरुडकरांनी पाहण्यासाठी गर्दी केली होती. २१३गणेशमुर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसच्या असल्याने त्या समुद्रात वीरगळल्या गेल्या नाहीत आणि पुन्हा समुद्राच्या लाटेबरोबर मूर्ती किनार्‍यावर आल्या. मुरुडचे ६० श्रीसदस्यांनी समुद्रकिनार्‍यावर येऊन वाहून आलेल्या मुर्तीना स्वच्छ करुन खोल समुद्रात पुन्हा विसर्जन करण्यात आले. डॉ. नानासाहेब प्रतिष्ठान तर्फे श्री सदस्य गेले अनेक वर्ष प्लास्टर ऑफ पॅरिस च्या मूर्तीचे विसर्जन करण्याचे काम करत आहेत.

 

चौकमध्ये भक्तीमय वातावरणात निरोप
चौकमध्ये १० दिवसांच्या गणरायांना भक्तीमय वातावरणात निरोप देण्यात आला. चौक येथील आदर्श मित्र मंडळ यांचा आदर्श राजा तसेच परिसरातील गावांतील मूर्तींचे विसर्जन झाले. यावेळी लहान थोर यांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले होते.तर अनेक चिमुकल्यांनी बाप्पाला निरोप देताना बाप्पाने जाऊ नये, यासाठी आग्रह धरला होता.

 

पोलीस अधिकार्‍याच्या ढोल वादनाने भाविक मंत्रमुग्ध

नागोठणे: येथील श्री सन्मित्र मित्र मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत रोहे उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम यांनी श्रींच्या विसर्जन सोहळ्यात ढोल वाजवत मिरवणुकीचा आनंद घेतला. त्यांचा उत्साह पाहून उपस्थित महिलांसह तरुणीनींही मिरवणुकीत सामील झाल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. श्री सन्मित्र मित्र मंडळाच्या या वर्षीच्या गणेशोत्सवाला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याने सर्व मंडळाचे पदाधिकारी आणि सदस्यांनी विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते.

First Published on: September 29, 2023 8:49 PM
Exit mobile version