भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त नवी मुंबईत मराठी भाषेचा जागर; विविध उपक्रमांचे आयोजन

भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त नवी मुंबईत मराठी भाषेचा जागर; विविध उपक्रमांचे आयोजन

बेलापूर: राजभाषा मराठीचे संवर्धन आणि जास्तीत जास्त वापर होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या वतीने १४ ते २८जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येत असून नवी मुंबई महापालिकेच्या वतीनेही आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
१७ जानेवारीस सकाळी ११ वा. सुप्रसिध्द कवी. अशोक नायगावकर यांचे ’मायबोली मराठी’ या विषयावर व्याख्यान आणि त्यांच्या प्रसिध्द कवितांचे सादरीकरण, १९रोजी भाषा अभ्यासक वैभव चाळके ’शुध्दलेखनाच्या दिशेने…’ या विषयांतर्गत सकाळी ११ वाजता शुध्दलेखनाचे शासकीय नियम व लेखन या विषयावर अधिकारी, कर्मचारी यांचेशी सुसंवाद साधणार आहेत.२० रोजी सायंकाळी ४ वाजता ‘कविता डॉट कॉम’ ही नवी मुंबईतील कवींची जिंदादील काव्यमैफल सादर होणार असून त्यामध्ये कवी प्रा. रविंद्र पाटील, जितेंद्र लाड,वैभव व-हाडी, शंकर गोपाळे, नारायण लांडगे पाटील, रुद्राक्ष पातारे आणि डॉ. कैलास गायकवाड सहभागी होणार आहेत.
२४ रोजी सायंकाळी ४ वा. सुप्रसिध्द साहित्यिक, कथाकार जी.ए.कुलकर्णी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम – ‘जीए – स्मरणखुणा‘ आयोजित करण्यात आला असून त्यामध्ये प्रा. वृषाली मगदूम, डॉ. मृण्मयी भजक आणि मिनाक्षी पाटील या जीएंच्या आठवणींना उजाळा देणार आहेत. तसेच त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये कथन करीत काही कथांचे अभिवाचन करणार आहेत. २७ रोजी सकाळी ११ वाजता महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांची ‘स्वकाव्यवाचन स्पर्धा’ आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेचा तसेच निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारभ होणार आहे.

निबंध स्पर्धेचे आयोजन
‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्त, ‘माझी वसुंधरा अभियान’ अंतर्गत नमुंमपा अधिकारी, कर्मचार्‍यांकरिता ‘निबंध स्पर्धा’ आयोजित करण्यात येत आहे. या स्पर्धेकरिता ‘पर्यावरण संवर्धन – माझी संकल्पना’ किंवा आणि ‘जागर अभिजात मराठीचा’ यापैकी एका विषयावर कमाल २००० शब्द मर्यादेत आपले निबंध कागदाच्या एका बाजूला लिहून (पाठपोट नाही) सादर करावयाचे आहेत. महापालिका अधिकारी , कर्मचारी यांनी आपले निबंध २० जानेवारी पर्यंत कार्यालयीन वेळेत प्रशासन विभागाचे अधिक्षक अरविंद उरसळ (८३६९६४७४५५) यांच्याकडे जमा करावयाचे आहेत. तसेच काव्य स्पर्धेकरिता आपली नाव नोंदणी२४ जानेवारीपर्यंत विधी अधिकारी अभय जाधव (७६७८००४५०२), अधिक्षक रवी जाधव (९९२०३७८५७४) यांचेकडे करणे आवश्यक आहे.

First Published on: January 14, 2023 6:17 PM
Exit mobile version