पालिकेचा निधी आरोग्य, शिक्षण, पावसाळापूर्व कामांसाठी वापरावा

पालिकेचा निधी आरोग्य, शिक्षण, पावसाळापूर्व कामांसाठी वापरावा

कोरोना महामारीच्या बिकट परिस्थितीत उपलब्ध निधीचा विनियोग आरोग्य सुविधा, शिक्षण आणि पावसाळापूर्व कामांवर प्राधान्याने खर्च करावा, अशी मागणी आमदार गणेश नाईक यांनी नवी मुंबई पालिका प्रशासनाला केली आहे. आमदार नाईक यांची कोरोना प्रतिबंधात्मक आढावा बैठक मंगळवारी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्यासोबत बेलापूर येथील पालिका मुख्यालयात सकाळी पार पडली. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत नवी मुंबई पालिका हद्दीत रूग्णांची दैनंदिन संख्या १५०० पर्यंत जावून पोहोचली आहे. कोरोना नियंत्रणाबाबत त्यांनी पालिकेला मौलिक सुचना केल्या. माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, माजी महापौर जयवंत सुतार, माजी महापौर सुधाकर सोनावणे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माजी सभागृहनेते रविंद्र इथापे, माजी विरोधीपक्षनेते दशरथ भगत मान्यवर उपस्थित होते.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत सरासरी ५०० ते ६०० पर्यंत राहत असलेली नवी मुंबईतील रूग्णसंख्या आता १४०० ते १५०० पर्यंत पोहोचली आहे. पहिल्या लाटेत उपचार घेत असलेले रूग्ण १ हजारांच्या आसपास होते. सद्यस्थितीत ही संख्या ४ हजारांवर पोहोचली आहे. कोविडचा वाढतो धोका पहाता, कोविड सेंटर्स, डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय कर्मचारी, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरर्ससह सर्व बेडची संख्या लवकरात लवकर वाढवावी. नवी मुंबईतील सर्व कोविड रूग्णांना उपचार मिळायला हवेत. तसेच कोरोना प्रतिबंधात्मक लसही मिळायला हवी. त्यासाठी राज्य सरकारकडे अधिक लसींची मागणी करावी. ठाणे, कल्याण-डोंबिवली या शहरांच्या तुलनेत लोकसंख्येच्या प्रमाणात नवी मुंबईला लसीचा पुरवठा कमी मिळतो. कारण नवी मुंबईत आपली सत्ता नाही, असे राज्यातील सत्ताधार्‍यांना वाटते. मात्र हा दुजाभाव योग्य नसल्याचे नाईक म्हणाले.

कोरोनाच्या सद्यस्थितील लोकांचे जीव वाचविणे महत्वाचे असून त्यापुढे कोणतेच काम मोठे असू शकत नाही. काही मंडळी अनावश्यक कामे सुचवून पालिकेकडे उपलब्ध निधी खर्च करू पाहत आहेत. अशा कामांना छेद देत सर्वप्रथम आरोग्य सुविधा सक्षम कराव्यात. नवीन रूग्णालये, नागरी आरोग्य केंद्रे सुरू करावीत. आरोग्य सुविधांनंतर मुलांचे भवितव्य घडविणारे शिक्षणावर आणि त्यानंतर पावसाळाजवळ आल्याने नागरिकांना काही त्रास होवू नये, यासाठी पावसाळा पूर्व कामांवर निधी खर्च करण्याचा सल्ला नाईक यांनी दिला.

हेही वाचा –

CitiBank गुंडाळणार भारतासह १३ देशातील व्यवसाय

First Published on: April 8, 2021 3:48 PM
Exit mobile version