Navimumbai : नवी मुंबईकरांना दुर्मिळ व्यंगचित्रे पाहण्याची संधी

Navimumbai : नवी मुंबईकरांना दुर्मिळ व्यंगचित्रे पाहण्याची संधी

नवी मुंबई : भारतातील सुप्रसिद्ध व्यंगचित्रकारांनी काढलेल्या १५० वर्षांपुर्वीची इतिहास घडविणारी दुर्मिळ व्यंगचित्रे पाहण्याची अनोखी संधी नवी मुंबईकरांना मिळणार आहे. इतकेच नाही तर राजकीय घडामोडीपासून ते समाज प्रबोधनात्मक ९२ नामवंत व्यंगचित्रकारांनी रेखाटलेल्या कार्टुन व्यंगचित्र दर्शना बरोबरच प्रदर्शन, पुस्तक प्रकाशन, प्रात्यक्षिक, चर्चा आणि मार्गदर्शन व स्वत:चे कार्टुन काढून घेता येणार आहेत. कार्टूनिस्ट्स् कम्बाईन, मराठी साहित्य, संस्कृती व कला मंडळ, प्रा.माणिकराव कीर्तने वाचनालय आणि महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या ५ व ६ मे रोजी कार्टून महोत्सव-२०२४ चे आयोजन वाशीतील साहित्य मंदिर सभागृहात करण्यात आले आहे.सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत महोत्सव नागरिकांसाठी खुले राहणार आहे.

हेही वाचा… Lok Sabha 2024 Voting : मतदान करायला जाताय? मग कोणते ओळखपत्र बरोबर न्यायचे समजून घ्या

५ मे रोजी जागतिक व्यंगचित्रकार दिनी सकाळी १० वाजता या महोत्सवाचे उद्घाटन, ११ वाजता युरोपातील व्यंगत्रिकलेच्या संग्रहालयांना भेटी देऊन आलेले प्रशांत कुलकर्णी यांचे अनुभव कथन, १२ वाजता चारुहास पंडित यांचे कॉमिक्स ते चित्रपट प्रवास वर्णन, दुपारी १ वाजता कॅलिग्राफर गजानन घोंगडे यांचे ‘घोंगडे की दुनिया‘ मधून अनुभव कथन, २ वाजता अतुल पुरंदरे यांचे चित्रकला ते व्यंगचित्रकलेचा अतुलनीय प्रवास सादरीकरण, ३ वाजता युरोपासह इतरत्र भटकंती करणारे प्रभाकर वाईरकर यांचे व्यंगचित्रकलेच्या जगात मार्गदर्शन आणि ४ वाजता पुणे विद्यापीठातील व्यंगचित्र संग्रहालय प्रमुख डॉ.प्रिया गोहाड यांचे ‘कार्टून म्युझियम बनवताना‘ मधून अनुभव नागरिकांना ऐकता येणार आहे.

तर ६ मे रोजी सकाळी १० चित्रकार उमेश कवळे ‘चित्रकला की व्यंगचित्रकला‘ क्षेत्रातील कसरतीवर व्याख्यान, ११ वाजता विवेक प्रभूकेळुस्कर हे व्यंगचित्रकला म्हणजे काय रे भाऊ? या विषयी आपल्या मिश्किल शैलीतून मार्गदर्शन करती तर दुपारी २ वाजता व्यंगचित्रकारांची आपापसात खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा सत्र होणार आहे.या कार्टून महोत्सव दुर्मिळ व नव्या पिढीतील व्यंगचित्र पाहण्याचा आणि विविध मान्यवरांचे अनुभव ऐकण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन निमंत्रक संजय मिस्त्री (अध्यक्ष-कार्टूनिस्ट्स ्कम्बाईन) आणि सुभाष कुलकर्णी (अध्यक्ष-मराठी साहित्य, संस्कृती व कला मंडळ, वाशी) यांनी केले आहे.

First Published on: May 3, 2024 6:21 PM
Exit mobile version