मुल्हेर किल्ल्याच्या पायथ्याला रंगला रासक्रीडा उत्सव

मुल्हेर किल्ल्याच्या पायथ्याला रंगला रासक्रीडा उत्सव

सटाणा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मुल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी उद्धव महाराज यांचे समाधी स्थळ आहे. सालाबादप्रमाणे यावर्षी सुध्दा रासक्रीडा उत्सव मोठ्या थाटात संपन्न झाला. समाधी स्थळाचे आजचे मठाधिपती भक्तराज महाराज यांच्या मार्गदर्शनाने हा सोहळा पार पडला. या सोहळ्याचे महत्त्व असे की, हा सोहळा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी भारतात वृंदावन व मुल्हेर या दोनच ठिकाणी साजरा होत असतो. प्रथम उद्धव महाराज यांच्या पादुकांची रथ मिरवणूक होते. तसेच सायंकाळी सात वाजता साधारण 101 फुटांचे गोलाकार चक्र केळीच्या पानाने व बांबूच्या सहाय्याने सजवले जाते. हे चक्र समाधी स्थळाच्या प्रांगणात एका लाकडी खांबावर ठेवले जाते. हे चक्र पूर्ण कार्यक्रम होईपर्यंत गोलाकार फिरवले जाते. असे मानले जाते की, हे चक्र श्रीकृष्ण यांच्या सुदर्शन चक्राचे प्रतीक आहे. म्हणून याला गोल फिरवले जाते. त्यानंतर संस्थानच्या देवघरापासून लहान मुले, मुली यांना गोपिकांचे वेषांतर करून देवघरापासून समाधी स्थळ अशी मिरवणूक काढली जाते व ही मिरवणूक समाधी स्थळापर्यंत आल्यावर पारंपारिक वाद्य वाजवून आनंदोत्सव साजरा होत असतो.

मंदिरात आल्यावर महाआरती होते. त्यानंतर रात्रभर भक्तगन भजन, कीर्तन साजरे करत असतात. तसेच याप्रसंगी गावातील समाजसेवकांकडून अन्नदान केले जाते. या दिवशी समाधी परिसरात यात्रेचे स्वरूप आलेले असते. या उत्सवाचे व समाधी स्थळाचे दर्शन घेण्यासाठी मुल्हेर, अंतापूर, ताहाराबाद, करंजाड, नरकोळ, जाखोड अशा बहुतांश गावातील महिला, पुरुष हजारोंच्या संख्येने उपस्थित राहतात. हा उत्सव रात्रीचा असल्याने भाविकांसोबत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जायखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली जायखेडा पोलीस स्टेशन व मूल्हेर दूरक्षेत्र यांचे पोलीस कर्मचारी रात्रभर आपले कर्तव्य बजावत होती.

First Published on: October 11, 2022 12:59 PM
Exit mobile version