भाग २८ – मराठी, साहित्य, संस्कृती आणि पवार साहेब

भाग २८ – मराठी, साहित्य, संस्कृती आणि पवार साहेब

महाराष्ट्राच स्वतःच अस एक सांस्कृतिक वैभव आहे.संपन्न अस साहित्य,कला,रंगभूमी यांचा या राज्याला मोठा गौरवशाली इतिहास आहे. अनेक नामवंत साहित्यिक,कलावंत,कलाकार यांनी या मातीत जन्म घेतला आणि आपल्या राज्याचं आणि देशाचं नाव सातासमुद्रापार नेलं.

जेंव्हा आपण आपल्या समाजाच्या प्रगती आणि विकासाचा विचार करतो तेंव्हा आपण आपल्या समाजाच्या सांस्कृतिक संपन्नतेचाही विचार करायला हवा असा स्व.यशवंतराव चव्हाण साहेब यांचा दृष्टिकोन होता.आणि या गोष्टींचा पवार साहेबांवर पगडा आहे अस म्हणायला हरकत नाही.कारण या सर्व क्षेत्रात पवार साहेबांनी केलेलं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष काम पाहता असच म्हणावं लागेल हे नक्की.

आपल्या मराठी भाषेबद्दल आपल्याला प्रचंड अभिमान आहे.आपण तो वेळोवेळी तसा दर्शवत देखील असतो.पवार साहेबांना देखील आपल्या या मायमराठी बद्दल मोठा अभिमान आहे.आणि याच उत्तम उदाहरण म्हणजे “जागतिक मराठी परिषेदेची स्थापना” होय. मराठी साहित्य,संस्कृती आणि मराठी विचार जगभर पोहचावा म्हणून या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. यानिमित्ताने जगभर पसरलेला मराठी माणूस एका व्यासपीठावर एकत्रित आला. जगभरातील मराठी माणूस एकमेकांशी जोडला जाऊ लागला आणि या लोकांची मराठी संस्कृतीविषयक असणारी जाणीव अधिक ठळक होऊ लागली. पुढे चालून या “जागतिक मराठी परिषदेच” अध्यक्षपद कुसुमाग्रज यांनी भूषवले.नंतर अनेक दिग्गजांनी या संस्थेचे अध्यक्षपद भूषवले.आणि जगभरात “जागतिक मराठी परिषद”ही मराठी संस्कृती दूरवर पोहचवणारी एक भक्कम आणि नावाजलेली संस्था म्हणून उदयास आली.

आपल्या राज्यात नाटकांचं ही एक विशेष स्थान जनमानसात आहे.जुन्या पिढीतील नाटकांची नव्या पिढीतील लोकांना ओळख व्हावी यासाठी साहेबांनी विशेष प्रयत्न केले. संगीत नाटक हे मराठी नाटकांच वैभव आहे.या प्रकारच्या नाटकांना चालना मिळावी यासाठी साहेबांनी “संगीत सौभद्र” सारख्या नाटकांना आर्थिक साहाय्य मिळवून दिल.बालगंधर्वांची अनेक नाटक नव्याने निर्माण व्हावीत म्हणून देखील साहेबांनी मोठ्या प्रमाणावर आर्थिक साहाय्य मिळवून दिल.

पवार साहेब पू.ल.देशपांडे यांचे जबरदस्त चाहते आहेत. विशेष म्हणजे साहेब ज्या बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये शिकत होते तेंव्हा त्यांनी महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनात “पुलं” यांच्या गाजलेल्या “तुज आहे तुजपाशी” या नाटकात काम देखील केलं होत. “महाराष्ट्राचे सांस्कृतिक राजदूत”, अस पवार साहेब पुलं यांचं वर्णन करतात.

साहेब शास्त्रीय संगीताचे देखील मोठे चाहते आहेत. तर लता मंगेशकर या त्यांच्या आवडत्या गायिका आहेत. जेंव्हा लता मंगेशकर यांनी आपल्या वडिलांच्या नावाने हॉस्पिटल सुरू करण्याचा निर्णय घेतला तेंव्हा पुण्यातल्या मध्यवर्ती ठिकाणी पवार साहेबांनी लता मंगेशकर यांना जमीन उपलब्ध करून दिली.आज त्यावर दीनानाथ मंगेशकर हे रुग्णालय दिमाखात उभं आहे.

महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागात एक स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती आहे.विदर्भ,मराठवाडा,खानदेश,कोकण,पश्चिम महाराष्ट्र अश्या प्रत्येक विभागाची आपली स्वतंत्र अशी ओळख आहे. बोलीभाषेची ही समृद्धी जपण्यासाठी मराठी भाषेचा स्वतंत्र विभाग शासन पातळीवर निर्माण करण्यात आला.शिवाय त्या त्या भागातील लोककलावंतांना अनेक निर्णय साहेबांच्या देखरेखीखाली घेण्यात आले.

थोडक्यात सांगायचं तर महाराष्ट्रातील म्हणा किंवा देशातील म्हणा,समाजाच्या प्रत्येक महत्वाच्या विषयांना साहेबांचा परिसस्पर्श झाला आहे..!

First Published on: July 31, 2020 12:15 AM
Exit mobile version