भाग २४ – श्री. शिवछत्रपती क्रीडानगरी निर्माण करणारे पवार साहेब

भाग २४ – श्री. शिवछत्रपती क्रीडानगरी निर्माण करणारे पवार साहेब

श्री. शिवछत्रपती क्रीडानगरी निर्माण करणारे पवार साहेब

पवार साहेब क्रीडाप्रेमी आहेत हे आपण सर्वजण जाणतोच. पवार साहेबांनी आपली ही ओळख पहिल्यापासूनच जपली देखील आहे.आणि याच उत्तम उदाहरण म्हणजे पुण्यात पवार साहेबांनी उभा केलेल भव्य क्रीडासंकुल.

१९९० चा काळ होता. पवार साहेब मुख्यमंत्री होते. राज्यातील तरुण खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाची सुविधा मिळावी, त्यांना प्रॅक्टिस करण्यासाठी एक उच्च दर्जाचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रीडासंकुल आपल्या राज्यात असावं हे साहेबांच स्वप्न होत. आणि या स्वप्नांना साहेबांनी प्रत्यक्षात उतरवण्याची तयारी १९९० ला सुरू केली. दिवस होता १२ डिसेंबर १९९०. म्हणजेच पवार साहेबांचा ५० वा वाढदिवस. आणि साहेबांच्या या महत्वकांक्षी योजनेला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी, या सर्व प्रोजेक्टचं डिझाईन करण्यासाठी प्रसिद्ध वास्तुविशारद शशी प्रभू हे साहेबांच्या सोबतीला होते.

खेळाडूंसाठी भव्य क्रीडासंकुल उभा करण्याची तयारी सुरू झाली आणि वेगात हे क्रीडासंकुल आकारास येऊ लागलं. या संपूर्ण प्रक्रियेत साहेबांच्या दुरदृष्टीचा अनेकांना अनुभव आला. खेळाडूंना रात्रीच्या वेळीही सराव करता येईल अशी सोय स्टेडियममध्ये करण्यात आली. इनडोर गेम्स, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, टेबल टेनिससाठी भव्य स्टेडियम, गादीवरील कुस्त्यांसाठी आखाडा, जिम्नॅस्टिकसाठी हॉल, टेनिस साठी विम्बल्डनच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोर्टस, पोहण्यासाठी ऑलिम्पिक दर्जाचा जलतरण तलाव, कबड्डी, खो-खोसाठी वेगवेगळी मैदाने,सायकलिंगसाठी वेलोड्रम अशा जवळपास ३० खेळांची सोय एकाच संकुलात करण्यात आली.

इतकेच नव्हे तर या संकुलासाठी परदेशातून सिंथेटिक ट्रॅक मागवण्यात आले. प्रेक्षकांना बसण्यासाठी भव्य गॅलरीज उभारण्यात आल्या, पत्रकारांसाठी देखील खास व्यवस्था करण्यात आली, कॅफेटेरिया, एकाच वेळी प्रवेशाद्वारे उघडून प्रेक्षकांची गर्दी वेगवेगळ्या मार्गाने बाहेर पडून मुख्य रस्त्यावर काही क्षणातच ओसरली जावी याची व्यवस्था….या आणि अशा अनेक सुचना पवार साहेबांनी केल्या आणि त्या प्रत्यक्षात देखील आणल्या.

पवार साहेबांच्या पाठपुराव्यामुळे विक्रमी ३ वर्षात या क्रीडासंकुलाची निर्मिती करण्यात झाली. हजारो खेळाडूंना यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचे संकुल प्रत्यक्षात वापरण्यास मिळाले. त्यांचा खेळ सुधारला. या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडासंकुलाचं नाव ठेवण्यात आलं, “श्री.शिवछत्रपती क्रीडानगरी..!”

 

First Published on: July 31, 2020 12:35 AM
Exit mobile version