भाग २ – मुंबईचा कायापालट करणारे साहेब

भाग २ – मुंबईचा कायापालट करणारे साहेब

मुंबईचे आर्थिक महत्त्व वाढविण्यात शरद पवारांचा महत्त्वाचा वाटा

मुंबई. देशाची आर्थिक राजधानी. जगातील निवडक आर्थिक संपन्न केंद्रापैकी एक. मुंबईचा हा नावलौकिक अगदी ब्रिटिशांच्या काळापासून. देशातल्या सर्व महत्वाच्या बँका,आस्थापन,मोठमोठ्या कंपन्यांची ऑफिसेस मुंबईलाच होती. स्वातंत्र्यानंतर मुंबईचा पसारा वाढतच गेला. अनेक नवीन कंपन्या, उद्योग मुंबईत मोठ्या प्रमाणावर येऊ लागले. १९७० च्या नंतर हा ओघ इतका वाढला होता की, दक्षिण मुंबई त्यासाठी अपुरी पडू लागली होती. जुन्या पायाभूत सुविधा कालबाह्य ठरू लागल्या होत्या.

म्हणजेच मुंबईची आणि पर्यायाने देशाची आर्थिक घौडदौड कायम ठेवायची असल्यास मुंबईमध्ये चांगल्या पायाभूत सुविधा, असलेले आर्थिक केंद्र उभे करण्याची गरज होती. मुंबईचा वाढता पसारा लक्षात घेऊन १९७७ साली “वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स”ची स्थापना करण्यात आली.

मुंबईचं हे नवं आर्थिक केंद्र मुंबईच्या मध्यभागी उभा राहणार होतं. त्यासाठी ३७९ हेक्टर जागा आरक्षित करण्यात आली होती. मुंबईला नवीन आर्थिक केंद्र बनविण्यात या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्सचा सिंहाचा वाटा असणार होता. आता गरज होती, ती एका सक्षम चेहऱ्याची. जो या कामाला गती देईल आणि ही गरज पूर्ण झाली ती पवार साहेबांच्या रूपाने.

१९७८ साली साहेब मुख्यमंत्री झाले. त्यांनी “वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स”च्या कामाला प्रचंड गती दिली. या आर्थिक केंद्राला सर्वाधिक गरज होती ती उत्तम दळणवळण व्यवस्थेची. साहेबांनी ही गरज पूर्ण करण्यावर मोठा भर दिला. उत्तम रस्ते, जवळच असलेल्या रेल्वेच्या वांद्रे टर्मिनसला ते जोडण्यात आले. सोबतच लोकमान्य टिळक टर्मिनस देखील जोडून घेण्यात आले.

उत्तम रस्ते, दळणवळण आणि इत पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर गरज होती ती, मोठमोठ्या उद्योगांना, आस्थापनांना या भागात येण्यासाठी आकर्षित करण्याची. पवार साहेबांनी याला प्राधान्याचा मुद्दा बनवला. त्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांना त्यांनी त्यांची मुख्यालयं वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये बनवावीत यासाठी विविध सवलती देत त्यांना आग्रहपूर्वक तिथे आणले.

परिणामी अनेक मोठे उद्योग, कंपन्या मुंबईत आल्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती झाली. लाखो हातांना रोजगार उपलब्ध झाला. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स मुंबईचं आणि देशाचं नवं आर्थिक केंद्र म्हणून उदयास आलं.

मुंबईच्या आजच्या रूपामध्ये, आजची मुंबई ही इतकी प्रगत असण्यामागे, पवारसाहेबांचा सिंहाचा वाटा आहे.

First Published on: July 31, 2020 2:25 AM
Exit mobile version