घोडबंदर किल्ल्यावर १०५ फुटी भगवा ध्वज

घोडबंदर किल्ल्यावर १०५ फुटी भगवा ध्वज

भाईंदर: घोडबंदर किल्ल्याच्या बुरुजावर १०५ फूट उंच हिंदवी स्वराज्याचा भगवा ध्वज फडकणार आहे. ध्वज स्तंभ उभारण्याचे काम पूर्ण झाले असून १९ फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती म्हणजेच शिवजयंतीच्या मुहूर्तावर भव्य ध्वज प्रतिष्ठापना सोहळा होणार आहे. एखाद्या गड – किल्ल्यावर असा उंच भगवा ध्वज असलेला घोडबंदर किल्ला महाराष्ट्रातील पहिला किल्ला ठरणार आहे.महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाची आठवण करून देणारा , स्फूर्ती आणि प्रेरणा, ऊर्जा देणारा भव्य-दिव्य असा हिंदवी स्वराज्याचा भगवा ध्वज घोडबंदरह किल्ल्यावर फडकणार आहे. साधारण १०५ फूट उंच ध्वजस्तंभ असून २० फूट उंच व ३० फूट लांब असा भगवा ध्वज असेल.

हा ध्वज २४ तास फडकत राहील. विशेष म्हणजे हा ध्वज रात्रीही दिसावा यासाठी आकर्षक अशी विद्युत व्यवस्था ध्वजाच्या दिशेने करण्यात आली आहे. घोडबंदर किल्ल्याच्या बुरुजावर ध्वजस्तंभ उभा करण्यासाठी क्रेन जाऊ शकली नाही. त्यामुळे सगळे काम मनुष्यबळ वापरून मोठ्या जिद्दीने करण्यात आले. शिवजयंतीच्या शुभदिवशी सकाळी ११ वाजता ’ध्वज पूजन यात्रा’ काढून ध्वजाची प्रतिष्ठापना येथे केली जाईल. घोडबंदर गावातील श्री दत्त मंदिरात ११ ब्राम्हणांकडून विधिवत या ध्वजाचे पूजन होणार आहे. त्यानंतर ढोलताशाच्या गजरात , तुतारीच्या निनादात ’ध्वज पूजन यात्रा’ निघेल. यात मीरा- भाईंदर शहरातील शिवप्रेमी सहभागी होणार आहेत. ध्वजाचे पूजन करून पालखीतून भगवा ध्वज किल्ल्यात नेला जाईल. तेथेही पूजन होऊन मग ध्वज स्तंभावर या ध्वजाची प्रतिष्ठापना केली जाईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यावर भव्य प्रमाणात उभा राहिलेला राज्यातील हा पहिला भगवा ध्वज असून या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरु करण्यात आली
आहे.

First Published on: February 16, 2023 9:39 PM
Exit mobile version