वसईत टीबीचे ३ हजार ७०० रुग्ण

वसईत टीबीचे ३ हजार ७०० रुग्ण

वसईः केंद्र शासनाने २०२५ पर्यंत देशातून टिबीचे समूळ उच्चाटन करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. वसई विरार परिसरात टीबीचे तब्बल ३ हजार ७०० रुग्ण असून वसई विरार महापालिकेने देखील क्षयरोग मुक्तीसाठी मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला २०२५ पर्यंत टिबीमुक्त करण्याचे ध्येय ठेवले आहे. त्या दृष्टिकोनातून सुधारीत राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत २४ जानेवारीपासून टिबी जनजागृती व रुग्ण शोध मोहीम राबवण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने नव्या आणि पुनरुपचारावरील क्षयरुग्णांना बरे करणे, रुग्ण शोधण्याचा दर वाढवणे, रेजिस्टंट रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढवणे, खासगी रुग्णालयांमधील टिबी रोग सेवेची परिणामकारकता वाढवणे आदि प्रमुख उद्देश असणार आहे. त्यासाठी केंद्राने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थासह आरोग्य विभागासाठी अध्यादेश काढला आहे. शहरतील रुग्णांना शोधण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

एक रूग्ण शोधल्यास ५०० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात येतो. वसई- विरार महापालिकेत २०२२ या वर्षात रुग्णांची संख्या ही ३ हजार ७०० एवढी होती. महापालिकेने १७ रुग्णांना दत्तक घेतले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. वसई विरार महापालिकेने केंद्र शासनाच्या निर्देशानुसार टिबी रोग मुक्तीचे अभियान सुरू केले आहे. त्यानुसार शहरी व ग्रामीण भागात रुग्ण शोध मोहीम राबवली जात आहे. सोबतच टिबी संदर्भात जनजागृतीही केली जात आहे. रुग्णांच्या शोध मोहिमेसाठी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना विशेष ट्रेनिंग दिले जात असून, यामध्ये खासगी डॉक्टरांचाही समावेश असेल. रुग्णांवर आवश्यकतेनुसार योग्य उपचाराची तयारी केली जात आहे. प्रत्येक रुग्णापर्यंत पोचण्यावर भर राहणार असून, १५ ते ४५ वर्ष वयोगटातील महिला व पुरुषांकडे विशेष लक्ष असणार आहे. शिवाय, समोर आलेल्या प्रत्येक रुग्णावर नियमीत उपचार करुन शंभर टक्के रुग्ण बरे होणे अपेक्षित आहे. मोहिमेच्या यशस्वीतेसाठी कोअर कमेटीकडे विशेष लक्ष असणार आहे.

First Published on: April 10, 2023 8:01 PM
Exit mobile version