मीरा -भाईंदर परिवहन सेवेत ५७ ई-बसेस होणार दाखल !

मीरा -भाईंदर परिवहन सेवेत ५७ ई-बसेस होणार दाखल !

भाईंदर :- मीरा -भाईंदर महापालिका परिवहन विभागाने ५७ इलेक्ट्रिक बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार त्याची रितसर निविदा काढून त्या ठेकेदाराच्या मार्फतच कंपनीत बनविण्यास दिल्या होत्या. आता त्या तयार होऊन १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त परिवहन विभागात ५७ इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहेत. परिवहन विभागात बसची संख्या अपुरी असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती. या ई-बसेस १ मे पासून परिवहन विभागात दाखल होणार असल्यामुळे शहरवासीयांना ई-बसची सेवा मिळणार आहे.

मीरा-भाईंदर महापालिकेने परिवहन सेवा २००५ पासून सुरू केली आहे. सुरुवातीला परिवहन सेवेकडून चांगल्या सुविधा मिळत नसल्यामुळे प्रवाशांची संख्या वाढत नव्हती. परंतु गेल्या काही वर्षांपासून चांगली सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे प्रवाशांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आता दिवसाला ९० हजार प्रवाशी संख्या झाली आहे. यामध्ये आणखी मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. परिवहन सेवेत सद्या ७४ बस आहेत. यातील ७० बस ठाणे, मुंबई व शहरांतर्गत मार्गावर चालवल्या जात असून उर्वरित चार बस राखीव ठेवण्यात आल्या आहेत. प्रवाशांची संख्या वाढत असल्यामुळे प्रवाशांना सुविधा देण्यासाठी बस कमी पडत आहेत. शहरात नवीन मार्गावर बस सुरू करण्याची मागणी नागरिक करत आहेत. बस कमी असल्यामुळे नवीन मार्ग सुरू करता येत नाहीत. त्यामुळे महापालिकेने नागरिकांना चांगली सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बस खरेदी करणे आवश्यक होते. महापालिकेला शासनाकडून हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी निधी देण्यात आला आहे. त्या निधीमधून ५७ इलेक्ट्रिक बस खरेदी करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

 

पालिकेला सुरुवातीला मे महिन्यात काही इलेक्ट्रिक बस मिळणार असून उर्वरित बस पुढील काही महिन्यात मिळतील. या बस दाखल झाल्यामुळे आणखी प्रवाशी संख्या वाढणार आहे. इलेक्ट्रिक बस दाखल झाल्यानंतर नवीन मार्गांवर देखील बस सुरू करण्यात येणार आहेत. ई-बस मुळे प्रदूषण कमी होणार असून पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होणार आहे.

– दिलीप ढोले, आयुक्त मीरा भाईंदर महानगरपालिका

First Published on: March 27, 2023 9:56 PM
Exit mobile version