ग्रामीण भागात थंडीच्या दिवसात पोपटीच्या पार्ट्यांची लगबग

ग्रामीण भागात थंडीच्या दिवसात पोपटीच्या पार्ट्यांची लगबग

वाडा: विशिष्ट हंगामातच तयार होणार्‍या वस्तू या त्याच हंगामात खाण्यासाठी काही खवय्यांची नेहमीच धडपड सुरू असते. सध्या थंडीमध्ये ग्रामीण भागात सर्वत्र वाल, तुरीच्या शेंगा, हुरडा तयार झाल्याने अनेकांची पावले ग्रामीण भागात, शेतघरांकडे वळू लागल्याचे चित्र दिसत आहे. विशेषतः पोपटीची खमंग चव घेताना अनेक ठिकाणी पार्ट्यांची लगबग दिसून येत आहे. वाडा, विक्रमगड तालुक्यात रब्बी हंगामात वाल, तूर आणि हरभर्‍याची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. या दोन्ही तालुक्यांत रब्बी हंगामात दोन हजार एकरपेक्षा जास्त क्षेत्रावर तूर, वाल, हरभरा पिकाची पेरणी केली जाते. त्यामुळे वाल, पावटा, तुरीच्या शेंगा खास करून पोपटी बनविण्यासाठी खवय्यांकडून खरेदी केल्या जातात. 60 ते 80 रुपये प्रति किलोने या हिरव्या शेंगांची विक्री होताना दिसत आहे. विक्रमगड, वाडा, कुडूस येथील बाजारपेठेत सद्या या शेंगा विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात खेडूत महिला दिसून येत आहेत.

शाकाहारी /मांसाहारी पोपटी
पोपटी दोन प्रकारची बनवली जाते. शाकाहारी पोपटीसाठी वाल, तुरीच्या शेंगामध्ये बटाटे, रताळे आणि अन्य प्रकारच्या शाकाहारी हिरव्या भाज्यांचा वापर केला जातो. तर मांसाहारी पोपटीसाठी चिकन, अंडी यांचा वापर केला जातो.

अशी बनवली जाते पोपटी
पोपटी बनविण्यासाठी प्रथम मडके घेऊन त्याच्या सर्व बाजूस भामुडची (बुराडा ) पाने ठेवली जातात. मडक्यात वाल,तूर, पावट्याच्या शेंगांचा थर आणि शाकाहारी पोपटीसाठी शाकाहारी भाज्या तर मांसाहारी पोपटीसाठी चिकन, अंडे मडक्याच्या आकारमानाच्या प्रमाणात घ्यायचे असते. पाला टाकून मडक्याचे तोंड बंद केले जाते. मडक्यातील हवा ही बाहेर येऊ नये म्हणून मडक्याच्या तोंडाशी माती लावली जाते. नंतर पोपटीचे मडके हे पेंढा किंवा गवतामध्ये ठेवून पेटविले जाते. 20 ते 25 मिनिटातच वाफेवरच ही पोपटी शिजते. पंधरा-वीस मिनिटे हे मडके पेंढा, गवताच्या आगीत ठेवतात. नंतर या मडक्यावर पाण्याचा शिडकाव करुन पोपटी तयार झाली की नाही याची खात्री केली जाते.

First Published on: January 28, 2024 10:17 PM
Exit mobile version