महामार्गावरील अवैध बांधकामे जमीनदोस्त

महामार्गावरील अवैध बांधकामे जमीनदोस्त

बोईसर : मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील अवैध धाबे व गाळे महसूल विभागाने जेसीबी चालवून अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त केले. पालघरचे तहसीलदार सुनील शिंदे यांच्या उपस्थितीत आदिवासी आणि वनविभागाच्या जागांवर बिगर आदिवासी लोकांनी बांधलेल्या बेकायदेशीर ढाबे व व्यावसायिक गाळ्यांवर तोडक कारवाई करण्यात आली आहे.महामार्गावरील पालघर तालुक्यातील चिंचपाडा ते ढेकाळे गावादरम्यान असलेल्या जवळपास ६० पेक्षा जास्त ढाबे व गाळे मालकांना त्यांनी केलेली अनधिकृत बांधकामे स्वतःहून काढून टाकण्याबाबत मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नोटीसा बजावल्या होत्या. मात्र नोटीसा बजावून २० ते २५ दिवस होऊन देखील बेकायदेशीर बांधकामे तशीच उभी असल्याने अखेर नांदगाव,दुर्वेस, हालोली,आवंढाणी, चिल्हार हद्दीतील जवळपास ३० ढाबे आणि व्यावसायिक गाळे तोडण्यात आले.ही कारवाई उद्यादेखील सुरूच राहणार आहे.तोडक कारवाई साठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.चार जेसीबी मशीन च्या मदतीने ही अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात येऊन भूमाफिया ना जोरदार दणका देण्यात आला. या कारवाई च्या वेळी तहसीलदार सुनील शिंदे, मनोर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी उमेश पाटील, मंडळ अधिकारी संदीप म्हात्रे, मनीष वर्तक,अनिल वायाळ, तलाठी नितीन सुर्वे, मनीषा कांबळे आणि महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

मुंबई – अहमदाबाद हायवेच्या दोन्ही बाजूला बिगर आदीवासी लोकांकडून मोठ्या संख्येने ढाबे आणि व्यावसायिक गाळे बांधण्यात आले आहेत.यातील बरेच ढाबे व गाळे हे स्थानिक आदीवासी व वन विभागाच्या जागेत अवैधपणे बांधण्यात आले असून जिल्हाधिकारी यांची कोणत्याही प्रकारे आवश्यक परवानगी न घेताच मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे करण्यात आली आहेत.यातील बर्‍याच ढाब्यांवर मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असून भोळ्या भाबड्या आदीवासींना फसवून तसेच त्यांना आमीषे दाखवत जमिनी बळकावण्यासाठी भूमाफीया आणि दलालांच्या अनेक टोळ्या सक्रीय आहेत.त्याचबरोबर हायवे शेजारील वनविभागाच्या जमीनींवर देखील अनेक ठिकाणी अतिक्रमण करण्यात आले आहे.

First Published on: April 25, 2023 10:06 PM
Exit mobile version