विरारचा पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन

विरारचा पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन

वसई : गेल्या काही महिन्यांपासून विरार पूर्वेकडील मनवेलपाडा परिसरात होत असलेला अनियमित व अपुरा पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा, या मागणीसाठी बहुजन विकास आघाडी मैदानात उतरली आहे. ही समस्या लवकरात लवकर निकाली न निघाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बविआ शिष्टमंडळाने दिला आहे. बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव अजीव पाटील, माजी नगरसेवक पंकज ठाकूर, महेश पाटील, जितुभाई शहा, मिनल पाटील, प्रशांत राऊत यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळात अन्य माजी नगरसेवक-नगरसेविका व कार्यकर्त्यांचा समावेश होता. या भेटीत या परिसरातील रहिवाशांची एक वर्षाची पाणीपट्टी माफ करण्याची मागणीही करण्यात आली. विरार पूर्वेकडील मनवेलपाडा भागात मागील एक वर्षात पाण्यासारखी अत्यावश्यक गरज पूर्ण होत नाही. सातत्याने अपुरा व अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या संतापाचा कडेलोट झालेला आहे.

हीच समस्या घेऊन बहुजन विकास आघाडीच्या शिष्टमंडळाने आज आयुक्त अनिलकुमार पवार यांची भेट घेतली व या परिसराला होणारा अपुरा व अनियमित पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा. तसेच या रहिवाशांची एक वर्षाची पाणीपट्टीही माफ करण्यात यावी, अशी मागणी केली. मनवेलपाडा विभागात गेली तीन वर्ष सातत्याने अपुरा व ३ ते ४ दिवसाआड अनियमित पाणीपुरवठा होत आहे. यामुळे विभागातील समस्त नागरिक, महिला वर्ग संतप्त झाला असून त्यांचा उद्रेक झाल्यास कठिण परिस्थिती निर्माण होऊ शकते. मनवेलपाडा विभागातील विवा जांगिड साठवण टाकीचे काम जलदगतीने पूर्ण करावे. सदर साठवण टाकीच्या ३५० एमएम व्यासाच्या जलवाहिनीचे गोपचरपाडा येथील रेल्वेलाईनखालून जोडणी गॅपवर्क बाकी आहे, ते लवकरात लवकर पूर्ण करावे, जेणेकरून विवा जांगीड टाकीत पाणी येऊन पाणीपुरवठा सुरळीत होईल. कारगिलनगर येथील साठवण टाकीची नियोजित जागा बदलून दुसरी जागा पाहून साठवण टाकीचे काम लवकर सुरू करावे. महापालिका हद्दीत सुरू असलेली पाणी साठवण टाक्यांची कामे लवकरात लवकर पूर्ण करावी, अशा अन्य महत्त्वाच्या मागणीही यावेळी करण्यात आल्या.

First Published on: February 14, 2023 9:18 PM
Exit mobile version