अंगाडीयाची लुटमार प्रकरण,चार जणांना अटक

अंगाडीयाची लुटमार प्रकरण,चार जणांना अटक

वसई: गुजरातच्या अंगाडीयाची १७ मार्चला महामार्गावरील खानिवडे टोल नाका पोलीस बतावणी करून घातलेल्या दरोड्याची उकल करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाला यश मिळाले आहे. या प्रकरणी चार आरोपींना अटक करून ४ कोटी ८७ लाख ५० हजार रुपये, १० लाखांची क्रेटा कार, ३ लाखांची वॅगनार कार, २ लाख ६५ हजारांचे पाच मोबाईल असा एकूण ५ करोड ३ लाख १५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली आहे. या गुन्ह्यातील फरार तीन आरोपींचा शोध घेत असल्याची माहितीही त्यांनी दिली. गुजरातच्या केडीएम अँड एमटेक अंगडीया कंपनीची पाच कोटी पंधरा लाखांची रोख रक्कम घेऊन तीन कर्मचारी १७ मार्चला सुरत ते मुंबईला क्रेटा कारने निघाले होते. त्याच रात्री ८ ते ९ वाजण्याच्या सुमारास खानिवडे टोल नाक्याच्या जवळ वॅगनार कारमधून आलेल्या पाच आरोपींनी क्रेटा कारमधील अंगाडीयाच्या कर्मचार्‍यांना पोलीस असल्याचे बतावणी करून मारहाण केली.

तीनपैकी एकाला आरोपींनी त्यांच्या वॅगनार कारमध्ये बसवले. तसेच क्रेटा कारमधील दोन कर्मचार्‍यांना मारहाण व दमदाटी करून त्यांचे मोबाईल फेकून देत वेगवेगळ्या टप्यावर कारमधून उतरवून रोख रकमेसह आरोपी पळून गेले. याबाबत मांडवी पोलिसांनी वेगवेगळ्या कलमानव्ये गुन्हा दाखल केला होता. हा गंभीर गुन्हा असल्याने वरिष्ठांनी गुन्हे शाखेच्या युनिट तीनला तपास देऊन गुन्ह्यांची उकल करण्याचे आदेश दिले. तांत्रिक विश्लेषण आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी मुरगनंदन अभिमन्यू (४६), बाबू मोडा स्वामी (४८), मनीकंडन चलैया (५०) आणि बालाप्रभू शनमुगम (३९) यांना ताब्यात घेऊन अटक केले आहे. आरोपींना वसई न्यायालयात हजर केल्यावर आरोपींना २८ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपी मुरगनंदन अभिमन्यू याच्यावर धारावी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्ह्यातील दोषसिद्ध आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे. वरील कामगिरी पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पोउपनिरी अभिजित टेलर, उमेश भागवत, पोलीस हवालदार अशोक पाटील, मनोज चव्हाण, सचिन घेरे, मुकेश तटकरे, सागर बारवकर, अश्विन पाटील, राकेश पवार, सुमित जाधव, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे, आतिश पवार, मनोहर तारडे, तुषार दळवी, प्रविण वानखेडे, गणेश यादव, सागर सोनवणे आणि सायबर सेलचे संतोष चव्हाण यांनी पार पाडली आहे.

First Published on: March 26, 2024 10:03 PM
Exit mobile version