शहरात २४ आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू करण्यास मंजुरी

शहरात २४ आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू करण्यास मंजुरी

भाईंदर :- मीरा-भाईंदर शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. नागरिकांना प्राथमिक वैद्यकीय उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने शासन योजनेतून ११ आरोग्यवर्धिनी केंद्र उभारण्याचे काम महापालिकेने सुरू केले आहे. आता आणखी २४ केंद्र उभारण्यास शासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात शहरातील नागरिकांना चांगली वैद्यकीय सुविधा मिळणार असल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे. पालिकेने शहरातील विविध भागात १० प्राथमिक उपचार केंद्र सुरू केलेले आहेत. या केंद्राद्वारे नागरिकांना चांगले उपचार उपलब्ध करून दिले जात आहेत. ही आरोग्य केंद्र महापालिका निधीमधून चालवली जात आहेत. परंतु,वाढत्या लोकसंख्येमुळे नागरिकांना नाईलाजास्तव खाजगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागतात. त्यामुळे नवीन आरोग्य केंद्र सुरू करणे आवश्यक होते. परंतु महापालिकेला निधी च्या कमतरतेमुळे आरोग्य केंद्र सुरू करणे शक्य नव्हते. मनपाच्या सुरू असलेल्या आरोग्य केंद्रावर उपचारासाठी जास्त रुग्ण येत असल्याने त्याचा आरोग्य व्यवस्थेवर जास्त ताण येत आहे.

तर काही भागातील नागरिकांना प्राथमिक उपचार केंद्रांवर जाण्यासाठी लांबवरून यावे लागते.त्यामुळे मनपाने केंद्र शासनाच्या राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाच्या अंतर्गत ११ आरोग्यवर्धिनी केंद्र उभारण्याच्या निर्णय घेतला आहे. ह्यातील एक रामदेव पार्क येथील केंद्र मे महिन्यात सुरू करण्यात आले आहे. तर उर्वरित १० केंद्राचे काम अंतिम टप्प्यात आहे. शहराची लोकसंख्या लक्षात घेता, शासनाने आणखी २४ केंद्रे उभारण्यास परवानगी दिली आहे. या केंद्रांसाठी लागणारे मनुष्यबळ व इतर आवश्यक साहित्य शासनाकडून पुरवले जाणार असल्याने त्याचा मनपाच्या तिजोरीवर मोठा ताण येणार नाही. सकाळच्या वेळेत मनपाचे आरोग्य केंद्र, तर दुपारनंतर आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना दिवसभर प्राथमिक उपचार घेता येणार आहेत. तसेच नव्याने उभारण्यात येणारी आरोग्य केंद्रे वेगवेगळ्या परिसरांत उभारली जाणार असल्याने प्राथमिक उपचारासाठी नागरिकांना लांबचा प्रवास करावा लागणार नाही. शासनाने परवानगी दिलेल्या आरोग्यवर्धिनी केंद्रासाठी शासनाने मनपाला डॉक्टर उपलब्ध करून दिले आहेत. परंतु त्या डॉक्टरांना कमी वेतन असल्यामुळे डॉक्टर लवकर उपलब्ध होत नाहीत व डॉक्टर उपलब्ध झालेच तर कमी वेतन असल्याने ते टिकत नाहीत. त्यामुळे नवीन केंद्र सुरू करण्याचा मोठा प्रश्न प्रशासनापुढे निर्माण झाला होता. त्यामुळे महापालिका प्रशासनाने शासनाकडून दिले जाणारे ६० हजार अधिक मनपाकडून २० हजार असे एकूण ८० हजार रुपये डॉक्टरांना दर महिना वेतन देण्याचे निर्णय घेतला असून तसा प्रस्ताव राज्य शासनाला सादर केला आहे.

First Published on: November 16, 2023 10:24 PM
Exit mobile version