पालघर नगर परिषदेचा शिलकीचा अर्थसंकल्प

पालघर नगर परिषदेचा शिलकीचा अर्थसंकल्प

पालघर : पालघर नगर परिषदेने 90 कोटी 50 लाख रुपयाचा शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर केला असून आगामी वर्षात शहरातील मूलभूत सुविधाचा स्तर उंचावण्यासोबत पाच मोठ्या कामांकरिता अर्थसंकल्पीय मंजुरी देण्यात आली आहे. 13 फेब्रुवारी रोजी नगराध्यक्षांनी हा अर्थसंकल्प स्थायी समितीने सुचवलेल्या शिफारशीसह सर्वसाधारण सभेत मांडला, या अर्थसंकल्पाला नगरपरिषद कौन्सिलने मान्यता दिली आहे. पालघर नगर परिषदेमार्फत अपंग लाभार्थ्यांना दरवर्षी प्रत्येकी १० हजार रुपये देण्याची योजना राबवली असून विद्यमान वर्षात 319 लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. या खेरीज नगरपालिका कायदा व नियमांप्रमाणे तसेच स्थायी निर्देश अनुसार अर्थसंकल्पातील प्रत्येकी पाच टक्के निधी अपंग कल्याण (२५ लक्ष), महिला बालकल्याण योजना (४५ लक्ष) तसेच मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी (४० लक्ष) खर्च करण्यात येणार आहे. याचबरोबरीने शहरातील क्रीडांगण विकसित करणे, श्री गणेश कुंडाचे सुशोभीकरण करणे, शहरातील मुख्य स्मशानभूमी विकसित करणे, डम्पिंग ग्राउंडला वॉल कंपाउंड उभारणे तसेच रस्ता अनुदानातून वैशिष्ट्यपूर्ण योजनेअमार्फत विविध प्रभागातील रस्ते विकसित करण्याचे योजिण्यात आले आहे.

मागील वर्षाच्या 82.19 कोटी रुपयांच्या आरंभी शिल्लकसह नगर परिषदेकडे 33 कोटी १० लाख रुपये जमा होणे अपेक्षित असून भांडवली जमा 58. 93 कोटी रुपयांसह नगरपरिषदेकडे 174 कोटी रुपये एकूण जमा होणे अपेक्षित आहे. त्याचबरोबर नगरपरिषदेचा 42.95 कोटी रुपयांचा खर्च, 36.23 कोटी रुपयांचा भांडवली खर्च असा एकूण ७९.१८ रुपयांचा खर्च होणार आहे. या अर्थसंकल्पात विविध नगरसेवकांमार्फत सुचवण्यात येणार्‍या कामांसाठी एक कोटी 50 लाख रुपये, शहरात सीसीटीव्ही बसवण्यासाठी 80 लाख रुपये, दिवाबत्ती देखभाल दुरुस्तीसाठी 40 लाख रुपये, मासळीमार्केटसाठी दोन कोटी रुपये, बगीचा सुशोभीकरणासाठी एक कोटी रुपये, समाजमंदिर उभारण्यासाठी दीड कोटी रुपये, दलित वस्तीसाठी दीड कोटी रुपये व मालमत्ता सर्वेक्षणासाठी चार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याखेरीज डॉक्युमेंट स्कॅनिंगसाठी, व्यायाम शाळा साहित्यसाठी प्रत्येकी 50 लाख रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत. या सभेत झालेल्या मालमत्ता कर वसुलीबाबत नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली.

First Published on: March 23, 2023 9:32 PM
Exit mobile version