ऑनलाईन टॉवेल खरेदीनंतर बँकतील पैसे पुसून नेले

ऑनलाईन टॉवेल खरेदीनंतर बँकतील पैसे पुसून नेले

भाईंदर :- मीरारोड येथील हटकेश परिसरात राहणार्‍या चारुबाला आनंद खरे या ७० वर्षीय महिलेची ऑनलाईन टॉवेल सेट खरेदी करताना विविध खात्यातून १० वेळा पैसे काढत ८ लाख २९ हजार १५ रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरण अज्ञात व्यक्ती विरोधात काशिमिरा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मीरारोड येथे राहणार्‍या चारुबाला खरे या ऑल इंडिया रेडिओमधून कार्यक्रम अधिकारी म्हणून सेवा निवृत्त झालेल्या आहेत. सेवानिवृत्त झाल्यानंतर मिळालेली रक्कम त्यांनी बँकेत ठेवली होती. त्यांच्या उदरनिर्वाहासाठी ठेवलेले पैसे सायबर गुन्हेगारांनी फसवणूक करून घेतल्यामुळे त्यांच्यावर संकट ओढवले आहे. चारूबाला खरे यांनी ऑनलाईन ६ टॉवेलचे पॅकेट खरेदी केले. त्याचे ११६९ रुपये गुगल पे वरुन पेयु वॉलेटवर त्यांनी पाठविले. त्याचवेळी त्यांच्या बँकेच्या खात्यातून १९००५ रुपये कट झाले. त्यानंतर त्यांनी बँकेला ऑनलाईन तक्रार केली.

तक्रार केल्यानंतर त्यांच्या मोबाईल वर एक अनोळखी व्यक्तीचा फोन आला. त्यावेळी त्या व्यक्तीने बँकेतून बोलत असल्याचे सांगून तुमचे पैसे परत करतो त्यासाठी एक अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर त्यांच्या एका बँक खात्यातून १ लाख रुपये गेल्याचा मेसेज आला. त्यांनी बँकेत जाऊन खाते बंद करण्यास सांगितले. परंतु तोपर्यंत त्यांच्या वेगवेगळ्या बँक खात्यातून ८ लाख २९ हजार १५ रुपये कट झाल्याचे समजले. त्यानंतर खरे यांनी खात्यातून पैसे गेल्याची सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार केली. सायबर गुन्हे शाखा, मिरारोड यांनी तपास करुन वेगवेगळ्या बँक खात्यातून लाखो रुपये हे अनोळखी व्यक्ती उत्तरप्रदेश राज्यातील जिल्हा अजमगढ रा. मक्सुडिया अम्बारी येथील दाऊद मसुद यांच्या बँक खात्यावर गेल्याचे सांगितले. त्यानंतर त्या अनोळखी व्यक्ती विरोधात काशिमिरा पोलीस ठाण्यात बँकेतून बोलत असल्याचे खोटे सांगून फसवणूक केली असल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

First Published on: March 27, 2023 9:51 PM
Exit mobile version