रो-रो शेतकर्‍यांसह फळ-मत्स्यविक्रेतांच्या फायद्याची

रो-रो शेतकर्‍यांसह फळ-मत्स्यविक्रेतांच्या फायद्याची

वसईः वसई ते भाईंदर दरम्यान सुरु असलेल्या रो-रो प्रवासी जलवाहतुकीचा फायदा शेतकर्‍यांसह फळ आणि मत्स्यविक्रेत्यांना होऊ लागला आहे. त्यासाठी सकाळ आणि संध्याकाळी त्यांच्यासाठी फेरी सोयीचे असल्याने ती सुरु करावी, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांनी महाराष्ट्र सागरी मंडळाचे कार्यकारी अभियंता अविनाश पाटील यांच्याकडे केली आहे.

वसई, निर्मळ, रानगाव, कळंब, अर्नाळा आणि परिसरातील पश्चिम पट्ट्यातून मुंबईत मोठ्या प्रमाणात फळे, मासे आणि भाजीपाला विक्रीस जात असतो. हा शेतमाल मुंबईत नेण्याकरता येथील शेतकर्‍यांना रेल्वे हा एकमेव पर्याय उपलब्ध आहे. मात्र, रेल्वे स्थानकापर्यंत जाण्याकरता शेतकर्‍यांना पहाटे व सायंकाळच्या वेळेत अन्य वाहनांचा आधार घ्यावा लागतो. यात त्यांचे श्रम आणि पैसा वाया जातो. अशावेळी महाराष्ट्र सागरी मंडळाने सुरू केलेल्या रो-रो सेवेचा फायदा होऊ लागला आहे. वसई-भाईंदरदरम्यान 20 फेब्रुवारीपासून रो-रो सेवा सुरू झाली आहे. पालघर जिल्ह्यात सुरू झालेली ही पहिली रो-रो सेवा आहे. या सेवेमुळे दोन्ही ठिकाणांचा प्रवास अगदी 15 ते 20 मिनिटांत शक्य झाला आहे. तसेच दोन्ही शहरांतील अंतर 34.7 किमीने कमी झाले आहे. ही सेवा सकाळी 6 ते संध्याकाळी 7 या वेळेत प्रवाशांसाठी उपलब्ध आहे. मात्र या सेवेचा अधिक फायदा शेतकर्‍यांना होऊ शकणार असल्याने या सेवेची नियोजित फेरी सकाळी व सायंकाळी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

First Published on: April 3, 2024 5:38 PM
Exit mobile version