Bhayander City:शहरातील सिमेंट काँक्रीट रस्त्यांची कामे संथ गतीने

Bhayander City:शहरातील सिमेंट काँक्रीट रस्त्यांची कामे संथ गतीने

भाईंदर :- मीरा -भाईंदर शहरातील रस्त्यातील खड्ड्यांची समस्या कायम स्वरूपी दूर करण्यासाठी नागरिकांना चांगले रस्ते देण्यासाठी सिमेंट काँक्रीट रस्ते बनवण्याची कामे गेल्या काही महिन्यांपासून महापालिकेने सुरू केली आहेत. शहरातील काही रस्ते एमएमआरडीए आणि महापालिका उर्वरित रस्ते सिमेंट काँक्रीटचे करत आहे. परंतु पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे ही कामे संथ गतीने सुरू आहेत. त्यामुळे रस्त्यावर धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या धुळीमुळे नागरिक त्रस्त आहेत. त्यात आता वाहतूक कोंडीत भर पडल्याने नागरिक आणखी रडकुंडीला आले आहेत.
मीरा- भाईंदर महापालिकेने शहरातील रस्ते खड्डे मुक्त करण्यासाठी सिमेंट काँक्रीट रस्ते बनवण्याची कामे सुरु केली आहेत. हे रस्ते ठिकठिकाणी खोदून ठेवले आहेत आणि त्यामुळे शहरात सगळीकडे धुळीचे साम्राज्य पसरले आहे. महापालिका विलंबाने काम करत असल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. पावसाळा दीड महिन्यांवर येऊन ठेपला असतानाही महापालिका प्रशासनाला कोणतेही गांभीर्य दिसत नाही,अशी नागरिकांची प्रतिक्रिया आहे. तर रस्ते खोदून ठेवल्याने ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. तसेच लोकांना जाण्या येण्यास त्रास होत आहे. पावसाळ्याच्या आधी कामे पूर्ण करण्याबाबत महापालिकेचे कोणतेही ठोस नियोजन दिसत नाही. त्यामुळे रस्त्यांची सध्या सुरु असलेली कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होतील की नाही याबाबत शंका आहे, असे आमदार प्रताप सरनाईक यांनी आयुक्तांना पत्राद्वारे विचारणा केली आहे.

एमएमआरडीएच्या माध्यमातून शहरात जी रस्त्यांची कामे सुरु आहेत ती वेगाने सुरू आहेत. तर महापालिकेची कामे संथ गतीने सुरू आहेत. महापालिकेने ज्या सिमेंट रस्त्यांची कामे सुरू केली आहेत त्या ठेकेदारांची बिले निघत नसल्याने ते पुढील काम करत नसल्याचे सांगितले जात आहे. महापालिकेने मे महिन्याच्या अखेरपर्यंत सिमेंट काँक्रीट रस्त्यांची कामे पूर्ण करावीत व त्याबाबत महापालिकेचे काय नियोजन आहे ते कळवावे. जर याबाबत आपण गंभीरपणे पावले टाकली नाहीत तर आपल्या या कारभाराबाबत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गंभीरपणे आपली तक्रार करावी लागेल असा इशारा आमदार प्रताप सरनाईक यांनी आयुक्तांना दिला आहे.

First Published on: April 28, 2024 10:58 PM
Exit mobile version