Bhayander News: नोकरीचे आमिष दाखवून फसवणार्‍यांवर गुन्हा दाखल

Bhayander News: नोकरीचे आमिष दाखवून फसवणार्‍यांवर गुन्हा दाखल

भाईंदर :- वेगवेगळ्या राज्यातून मीरा -भाईंदरमध्ये आलेल्या २०० पेक्षा जास्त कामगारांना नोकरीसाठी परदेशात पाठवण्याचे आमिष दाखून त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांची फसवणूक करण्यात आली होती. अखेर आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेबाबत संबंधित लोकांनी नवघर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि पोलिसांना सर्व प्रकार सांगितला. सोशल मीडिया आणि वर्तमानपत्रातील जाहिरात पाहून अनेक जण या आमिषास बळी पडले. पण पुराव्यांअभावी कारवाई होऊ शकत नाही असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

यानंतर सर्व पीडितांनी २७ एप्रिल रोजी स्थानिक आमदार गीता जैन यांच्या कार्यालयात त्यांची भेट घेऊन, घडला सर्व प्रकार सांगितला. याबाबत पोलीस कारवाईमध्ये दिरंगाई होत असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार जैन यांनी पोलीस आयुक्तांशी संपर्क करून त्यांना याबाबत सविस्तर माहिती दिली. पोलिसांनी तातडीने, जेसल पार्क स्थित, ईगल प्लेसमेंट नावे असलेल्या आरोपीच्या ऑफिसवर छापा मारून, त्यामध्ये १३५ लोकांचे पासपोर्ट मिळवले. हे सर्व पासपोर्ट पोलिसांनी त्वरित पीडितांना सुपूर्द केले. सदर प्रकरणात आरोपी साहिल शेख, सुरुची , नरसुल्लाह अहमद शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोबतच विविध पीडित लोकांकडून जे पैसे उकळले, त्या अनुषंगाने आरोपिशी संबंधित दोन बँक खाती सील ( फ्रिज) करून ताब्यात घेण्यात आली आहेत.

First Published on: April 28, 2024 10:37 PM
Exit mobile version