Bhayander News: आयुक्तांकडून मान्सूनपूर्व नालेसफाईचा आढावा

Bhayander News: आयुक्तांकडून मान्सूनपूर्व नालेसफाईचा आढावा

भाईंदर :- मीरा -भाईंदर शहरात मान्सूनपूर्व नालेसफाई सुरू करण्यात आली आहे. या मान्सूनपूर्व नालेसफाईचा आढावा घेण्यासाठी आयुक्त संजय काटकर यांनी शहरात विविध ठिकाणी पाहणी जाऊन पाहणी केली. मीरा -भाईंदर शहरात दरवर्षी मान्सूनपूर्व नालेसफाई करण्यात येते. या नालेसफाईच्या नावाखाली अधिकारी व ठेकेदार हे हातसफाई करत असल्याचा आरोप केला जात आहे. नालेसफाईमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा देखील आरोप केला जातो. यावर्षी नालेसफाई व्यवस्थित होत असल्याची खात्री करण्यासाठी आयुक्त संजय काटकर यांनी मान्सून पूर्व नालेसफाईचा आढावा घेतला. यावेळी पालिका आयुक्तांनी मीरारोड येथील १५ नंबर बस स्टॉप, जेपी इन्फ्रा, सिल्व्हर सरिता, रेल्वे समांतर येथील नाला, भाईंदर पश्चिम याठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणी दरम्यान अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर, शहर अभियंता दिपक खांबित, नाविन्य कक्षातील प्रतिनिधी आणि स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते.

सर्वप्रथम शहरात ज्या ठिकाणी नाल्यांचे बांधकाम झाले आहे .त्यावरील झालेले अतिक्रमणवर कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले. नालेसफाई , गटारसफाई केल्यानंतर काठाशी काढून ठेवला जाणारा गाळ थोडासा सुकल्यानंतर लगेच उचलला जावा याबाबत स्वच्छता निरीक्षकांना सूचना देण्यात आल्या. रस्त्यालगत, नाल्याच्या बांधकामालगत पडलेले डेब्रिज त्वरित उचलण्याचे निर्देश बांधकाम विभागास देण्यात आले. ज्याठिकाणी कच्चे नाले खोदाई व नाल्यांचे बांधकाम सुरू आहे त्याची यादी त्वरित सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नालेसफाई सुरू असलेल्या प्रभागातील सर्व स्वच्छता निरीक्षकांनी नियमित नालेसफाईचा आढावा घेण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. यंदाच्या वर्षी नालेसफाईच्या कामात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा चालणार नसून नालेसफाईची कामे ही मुदतीच्या आत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकार्‍यांना आयुक्त संजय काटकर यांनी दिल्या आहेत.

First Published on: April 24, 2024 10:29 PM
Exit mobile version