Bhayander Police News:पोलीस आयुक्तालयातून गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई

Bhayander Police News:पोलीस आयुक्तालयातून गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई

भाईंदर :- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मीरा -भाईंदर, वसई -विरार पोलीस आयुक्तालय परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांच्या आदेशानुसार तिन्ही पोलीस उपायुक्त परिमंडळाच्या पोलीस उपायुक्तांना आदेश देण्यात आले होते. त्यानुसार तिन्ही परिमंडळाच्या पोलीस उपायुक्तांनी आतापर्यंत अनेक सराईत गुन्हेगारांवर तडीपार, प्रतिबंधात्मक कारवाई करत हद्दपार, स्थानबद्ध, अशा कारवाई केल्या आहेत. मीरा-भाईंदर, वसई -विरार पोलीस आयुक्तालय हे ठाणे व पालघर जिल्ह्यात संयुक्त आहे, त्यामुळे याठिकाणी दोन लोकसभा मतदार संघ आहेत, त्यानुसार अशा कारवाई करण्यात आल्या आहेत. तसेच येत्या काही दिवसात प्रतिबंधात्मक कारवाई अधिक तीव्र केली जाणार आहे, यात परिस्थिती प्रमाणे आरोपीवर मोक्कांअंतर्गत सुद्धा कारवाई केली जाणार आहे.

एका मीरा- भाईंदर परिमंडळ – १ मधून आतापर्यंत १० जणांवर कारवाई करण्यात आली आहे. सराईत गुंडांना ठाणे, पालघर, बृहन्मुंबई, मुंबई उपनगर, या जिल्हा कार्यक्षेत्रातून तडिपार केले आहे. तसेच मारामारी, खून किंवा खुनाचा प्रयत्न, लुटमारी, दहशत निर्माण करणे, शस्त्रे बाळगणे, अमली पदार्थ विक्री करणे, मालमत्तेवर कब्जा करणे, सरकारी जागेवर अतिक्रमण करून अनधिकृत बांधकामे करणे, दुसर्‍यांच्या जमिनीवर अतिक्रमण करून विक्री करणे, भूमाफिया, वाळू तस्कर, निवडणुकीत उपद्रवी ठरणारे संशयित, सोशल मीडियावर तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे यांना नोटिसा, असे संशयीत गुन्हेगारांचे वर्गीकरण करून त्यांच्या विरोधात काही अट्टल गुन्हेगारांवर तडीपाराची तर काहींवर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे.

First Published on: April 28, 2024 10:32 PM
Exit mobile version