वसईत ५० ठिकाणी चार्जिंग स्टेशन्स

वसईत ५० ठिकाणी चार्जिंग स्टेशन्स

वसई : केंद्र सरकारच्या राष्ट्रीय हवा शुध्दीकरण कार्यक्रमांतर्गत वसई- विरार शहरात पन्नास ठिकाणी चार्जिंग स्टेशन्स उभारली जाणार आहेत. त्यासाठी जागेचा शोध सुरु करण्यात आला आहे. वसई विरारमध्ये विद्युत वाहनांचा वाढता वापर पाहता वसई- विरार महापालिकेने शहरामध्ये ५० ठिकाणी चार्जिंग केंद्रे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी राष्ट्रीय हवा शुध्दीकरण कार्यक्रमांतर्गत महापालिकेला शासनाकडून निधी मिळाला आहे. त्यातूनच चार्जिंग स्टेशन बांधली जाणार आहेत.

इंधनावरील वाहनांमुळे प्रदूषणाचा स्तर वाढत चालला आहे. त्यावर उपाय म्हणून विद्युत वाहन वापराला चालना मिळावी यासाठी चार्जिंग स्टेशन बांधणे हे एक प्रमुख कारण आहे. महापालिकेकडून चार्जिंग केंद्रे निर्माण करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. त्यासाठी ठिकाणांची पाहणी करण्याचे काम सुरू आहे. ज्याठिकाणी वाहनांची वर्दळ अधिक असते अशी ठिकाणे शोधली जात आहेत. त्यासाठी वाहतूक शाखा आणि परिवहन विभागाची मदत घेतली जाणार आहे.
त्याचबरोबर सदर विषयातील तांत्रिक बाजू समजावून घेण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेतली जाणार आहे. सध्या या चार्जिंग केंद्रांवरील सेवा सशुल्क की मोफत याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नसून जर शुल्क आकारले तर ते कमीत कमी असेल, अशी माहिती आयुक्त अनिलकुमार पवार यांनी दिली. चार्जिंग स्टेशनच्या कामाला साधारण तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे. वसई- विरार शहरात दुचाकी, चारचाकी, आणि रिक्षा मिळून 4 हजार ४६९ विद्युत वाहने आहेत. यात दुचाकी वाहनांची संख्या सर्वाधिक आहे.

First Published on: January 16, 2023 9:50 PM
Exit mobile version