‘आनंदाचा शिधा’ वाटपात पुरवठा विभागाचा गोंधळ

‘आनंदाचा शिधा’ वाटपात पुरवठा विभागाचा गोंधळ

पालघर: गोरगरिबांची दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने सरकारने डाळ, साखर, रवा, गोडेतेल असा दिवाळी किट अंतत्योदय केशरी व शिधापत्रिका धारकांना देण्याचे जाहीर केले. मात्र, आनंदाचा शिधा लाभार्थ्यांना पोहोचण्यास दिवाळीचा दुसरा-तिसरा दिवस उजाडला. त्यातही अनेक ठिकाणी साखरेविनाच शिधा दिला गेला. या किटची खर्‍या अर्थाने आदिवासींना गरज होती. पण, राज्य सरकारने गरीबांची दिवाळी गोड करण्यासाठी शंभर रुपयांमध्ये एक किलो चना डाळ, एक किलो पामतेल, रवा, एक किलो साखर असा आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, दिवाळी उजाडली तरी जिल्ह्यातील अनेक दुकानांवर किट पोहचले नव्हते. डहाणू, तलासरी आणि मोखाडा येथे आनंदाचा शिधा उशिरा पोचल्याचे निदर्शनास आले. या तालुक्यांतच आदिवासी गरीब कुटुंबे मोठ्या प्रमाणावर आहेत. तेथील गरीब आदिवासी प्रत्येकवर्षी स्थलांतर करतो. तसेच जव्हार येथे रव्या व्यतिरिक्त काहीही प्राप्त झालेले नव्हते. दिवाळीचा फराळ बनवून झालेला असताना शिधा वाटप सुरु झाले होते.

पालघर जिल्ह्यात एकूण ४ लाख ३ हजार १४८ जणांना आनंदाचा शिधा वाटप करण्याचे काम सुरू आहे. मात्र पालघर वगळता अन्य सर्व तालुक्यात डाळ प्राप्त झालेली नव्हती. तर वसई तालुक्यात दिवाळी उजाडल्यानंतर शिधा पोचला. त्यातही अनेक दुकानांत किटमधून साखरच गायब झाली होती. शिधा ऑफलाईन देण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला असता तर चार लाख गरिबांवर ही वेळ आलीच नसती. ऑनलाईन प्रणाली सदोष असल्याचे निष्पन्न झाले असून त्याचा त्रास रास्त भाव धान्य दुकानदारांनाही सोसावा लागला. धक्कादायक बाब म्हणजे गरिबांचा आनंदाचा शिधा पोचला की नाही, याची खातरजमा न करताच अधिकारीवर्गाने मुख्यालय सोडले होते. अधिकारीवर्ग सुट्टी एन्जॉय करीत असल्याचे पहायला मिळाले. भ्रमणध्वनीच्या आधारे आढावा घेणे पसंत केल्याने अधिकारीवर्गाची उणीव भासली नसली तरी गरीब जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करण्यात आल्याने पालघर जिल्हा पुरवठा विभागावर नाराजी व्यक्त होत आहे.

अंत्योदय आणि प्राधान्यक्रम कुटुंबातील पात्र शिधावाटप धारकांना शंभर रुपयांमध्ये आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर सर्व्हर प्रणाली योग्य असल्याचे न पाहता टप्प्याटप्प्याने आलेल्या वस्तूंचे वाटप एकत्रितपणे करण्याच्या सूचना संबंधित दुकानदारांना दिल्या गेल्या आहेत. त्यामुळे दुकानांबाहेर रांगाच्या रांगा दिसू लागल्या आहेत. गरीब जनता उन्हातान्हात ताटकळत उभी असताना संबंधित अधिकारीवर्गाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचे पहायला मिळाले.
ज्याठिकाणी ऑनलाईन प्रणालीत अडचण असल्यास तिथे ऑफलाईनने शिधावाटप करण्यात यावे, अशा सूचना दिल्या. मात्र, या सूचना सर्वप्रथम दिल्या असत्या तर या सर्व ग्राहकांची दिवाळी आनंदात गेली असती. मात्र, धान्य दुकानदारांना या सूचना उशिरा पोहोचल्याने त्यांच्याही कामाचा व्याप वाढताना दिसत आहे. दुकानांसमोर मोठमोठ्या रांगा असल्याने दुकानदारांचाही तोल ढासळला असल्याचे पहायला मिळाले. अनेक ठिकाणी वादाचे प्रसंगही उद्भवले. मात्र, याचा मागमूसही अधिकारीवर्गापर्यंत पोचला नसल्याने त्याचे गांभीर्य समजत नसल्याचे पहायला मिळाले.

डहाणू, जव्हार, मोखाडा तालुक्यातील चारणगाव तसेच अन्य ठिकाणी शिधावाटप करण्यात आले. अंतिम क्षणी ऑफलाईन वाटप सुरू आहे. अडचण आल्यास तत्काळ सोडवली जाईल.
– पोपट ओमासे,
जिल्हा पुरवठा अधिकारी, पालघर

First Published on: October 25, 2022 9:29 PM
Exit mobile version